नवी दिल्ली :चंद्रयान -3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचं जगभरात कौतुक केलं जातंय. काँग्रेस पक्षानेदेखील इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलंय. परंतु चंद्रयान-3 चं यश हे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे मिळाल्याचं काँग्रेसनं म्हटलयं. नेहरूंनी सुरुवातीला केलेल्या प्रयत्नांमुळे आज आपण चंद्रयान-3 चं यश पाहू शकत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस पक्षानं दिलीय.
काँग्रेसनं काय म्हटलं : चंद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारत अमेरिका, चीन, रशिया यांच्या पंगतीत जाऊन बसलाय. दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-3 च्या मोहिमेतून संशोधन केले जाणार आहे. भारताचा चंद्रापर्यंतचा प्रवास एक दृढनिश्चयाची आणि दूरदृष्टीची कहाणी सांगणारा आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाने आणि दूरदृष्टीने भारतीय अवकाश संशोधनाचा पाया घातला गेला. यामुळे आपण जे आज चांद्रयान-3 चे यश पाहत आहोत. ते नेहरूंच्या सुरुवातीच्या प्रयत्नांचा परिणाम आहे, असं काँग्रेस पक्षानं X (आधीचे ट्विटर) या सोशल मीडियावर साईटवर लिहिलंय. काँग्रेसनं म्हटलं की, हे प्रत्येक भारतीयांचे सामूहिक यश आहे. इस्रोचं हे यश विलक्षण आहे.
140 कोटी जनतेच्या राष्ट्रानं 6 दशकांच्या अंतराळ कार्यक्रमात नवे यश मिळवले. संपूर्ण जग भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडे (इस्रो) पाहत आहे. त्यांचे कौतुक करत आहे. ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. - काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे