महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी; राहुल गांधींची केंद्रावर टीका

सामान्य नागरिक आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी, स्थलांतरीत मजुरांची आर्थिक परिस्थिती सुधारणे गरजेचे असल्याचे राहुल गांधी म्हणाले. मात्र, अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी आहे, असे खोचक टि्वट केले.

राहुल गांधी-मोदी
राहुल गांधी-मोदी

By

Published : Apr 10, 2021, 4:13 PM IST

नवी दिल्ली -काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात असेलल्या केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला. सरकारच्या अयशस्वी धोरणांमुळे आज देशाला कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेचा सामना करावा लागत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. टि्वटच्या माध्यमातून त्यांनी सरकारला लसीकरण गती वाढवण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी स्थलांतरीत मजुरांच्या आर्थिक परिस्थितीवर जोर दिला. कामगारांची परिस्थिती सुधारल्यास देशाची अर्थव्यवस्था रुळावर येऊ शकेल, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच आणखी एक टि्वट करत त्यांनी मोदींवर टीका केली. देशाला नोकऱ्या आणि लसीकरणाची गरज आहे. मात्र, सरकार फक्त 'जुमला' देत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची भयंकर दुसरी लाट पसरली आहे. स्थलांतरीत कामगारांना पुन्हा आपल्या गावाची वाट धरावी लागली आहे. त्यांच्या हातात पैसे देणे आवश्यक आहे. सामान्य नागरिक आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हे करणे गरजेचे आहे. मात्र, अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी आहे, असे खोचक टि्वट केले.

राहुल गांधींचे मोदींना पत्र -

शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोना परिस्थिती आणि लसीचा तुटवडा, याबाबत सवाल केले होते. कोरोना लसीच्या निर्यातीवर त्वरित बंदी घालण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली होती. इतर लसींनाही वेगवान मार्गाने मान्यता देण्यात यावी, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले होते. तसेच 11 ते 14 एप्रिल या काळात लसीकरण महोत्सव साजरा करण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाचा संदर्भ देत, राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका केली. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना लसीची कमतरता ही गंभीर समस्या आहे, असे ते म्हणाले.

काँग्रेस मुख्यमंत्र्यांची बैठक -

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोनासंदर्भात काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांसमवेत आढावा बैठक घेतली. पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनीही या बैठकीला हजेरी लावली. या बैठकीत कोरोनामुळे राज्यांत निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. परिस्थितीचा आढावा घेत सोनिया गांधी यांनी राज्यातील मुख्यमंत्र्यांना कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी चाचणी घेणे, लसीकरण करणे आणि परिस्थितीचा मागोवा घेत राहण्याच्या सूचना दिल्या. महाराष्ट्र, ओडिशा, आंध्र प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, बिहार यासह अनेक राज्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

हेही वाचा -बंगालमध्ये भाजपा सत्तेत येणार? काय म्हणाले प्रशांत किशोर...

ABOUT THE AUTHOR

...view details