नवी दिल्ली : केंद्र सरकारने 'नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी'चे (NMML) नाव 'पंतप्रधान संग्रहालय आणि सोसायटी' असे करण्याचा निर्णय घेतला आहे. नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीच्या विशेष बैठकीनंतर नाव बदलण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक : या विशेष बैठकीचे अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंह होते, जे सोसायटीचे उपाध्यक्ष देखील आहेत. एनएमएमएलएचे उपाध्यक्ष आणि कार्यकारी परिषदेचे सदस्य सूर्यप्रकाश म्हणाले की, 'सोसायटीच्या सर्वसाधारण सभेने ठराव मंजूर करणे हे छोटे पाऊल नाही. लोकशाहीप्रती आमची बांधिलकी पुन्हा सांगण्यासाठी हे एक मोठे पाऊल आहे'.
जयराम रमेश यांची टीका : मात्र या नामांतरावरून आता राजकारण तापले आहे. काँग्रेसने यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विट केले की, 'मोदी हे संकुचित वृत्ती आणि सूडबुद्धीचे दुसरे नाव आहे. 59 वर्षांपेक्षा अधिक काळापासून नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी हे जागतिक बौद्धिक खुणा, पुस्तके आणि नोंदींचे खजिना आहे. भारताच्या शिल्पकाराचे नाव आणि वारसा बदनाम करण्यासाठी, त्याला अपमानित करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी पंतप्रधान मोदी काय करणार नाहीत? आपल्या असुरक्षिततेच्या ओझ्याखाली दबलेला एक छोटा माणूस स्वयंघोषित विश्वगुरू म्हणून हिंडत असतो.'
भाजपचा पलटवार : नेहरू स्मारकाचे नाव बदलल्यावरून काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला असताना भाजपनेही त्यावर पलटवार केला आहे. देशाच्या सर्व माजी पंतप्रधानांच्या कार्यकाळाचा आणि कर्तृत्वाचा उल्लेख तेथे केला आहे, असे भाजपने म्हटले आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, काँग्रेसच्या किती नेत्यांनी नेहरू स्मारक आतून पाहिले? पूर्वी त्याची अवस्था फार वाईट होती. ते धूळ खात होते. त्याची पूर्ण मांडणी, जवाहरलाल नेहरूंशी संबंधित गोष्टींची मांडणी आणि आधुनिक पद्धतीने डिजिटल स्वरूपात ठेवण्याचे काम मोदी सरकारने केले आहे.'
'सर्व माजी पंतप्रधानांच्या कामगिरीचा उल्लेख' : त्रिवेदी म्हणाले की, सर्व माजी पंतप्रधानांचा कार्यकाळ आणि त्यांच्या कामगिरीचा उल्लेख येथे करण्यात आला आहे. काँग्रेसला लालबहादूर शास्त्री, नरसिंह राव आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी अडचण असेल, पण काँग्रेसला स्वत:चे माजी पंतप्रधान, घराण्याशी संबंधित माजी पंतप्रधान - इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची अडचण आहे का? तेथे इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यासह सर्व माजी पंतप्रधानांच्या कामगिरीचा उल्लेख करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- Wrestler Protest : पुढे काय करायचे लवकरच ठरवू, साक्षी मलिकचा बृजभूषण सिंह विरोधातील चार्जशीटप्रकरणी हल्लाबोल
- Baba Ramdev : बाबा रामदेव 2024 मध्ये कोणाला पाठिंबा देणार?, म्हणाले, 'जो पक्ष..'