हैदराबाद - महाराष्ट्रात अनेक मोठ्या शहरांमध्ये मोठी ग्रंथ संग्राहालये आहेत. त्यांना शासनाकडून अनुदानही मिळते. त्यातूनच नवी पुस्तके, इमारतीची देखभाल आणि कर्मचाऱ्यांचा पगारही भागवला जातो. मात्र महाराष्ट्राबाहेर तेलंगणा राज्यात एक मराठी ग्रंथ संग्राहलय आहे जे सरकारी अनुदानावर अवलंबून राहता इथल्या मराठी माणसांनी आपला वेळ, पैसा आणि शक्ती पणाला लावून कार्यरत ठेवलंय. आज ग्रंथालयात 40,000 मराठी ग्रंथसंपदा आणि 1200 अत्यंत दुर्मिळ संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या ग्रंथालयाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत.
ही संस्था यावर्षी आपल्या स्थापनेची शंभर वर्षे पूर्ण करीत आहे. महाराष्ट्राबाहेर असून मराठीची वाचन संस्कृती जागृत ठेवणे आणि इतकी वर्षे सुरळीतपणे चालू राहणे हे एखाद्या परप्रांतात खरे तर दिव्यच म्हणावे लागेल. शताब्दी वर्ष महोत्सवानिमित्त गेल्या एक वर्षापासून मराठी ग्रंथ संग्रहालयात वेगवेगळे उपक्रम घेतले गेले. सांस्कृतिक साहित्यिक वारसा पुढे चालवणारे तसेच सामाजिक समस्यांबद्दल भाष्य करणारे असे कार्यक्रम ग्रंथालयाने आयोजित केले होते.
मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना 22 ऑक्टोबर 1922 रोजी झाली. बडी चावडी येथील जोशी यांच्या वाड्यात सुरुवातीला हे ग्रंथालय सुरु करण्यात आले. आणि पुढे 1947-48 च्या दरम्यान आता आहे त्या ठिकाणी ते हलवण्यात आले. मराठी ग्रंथ संग्रहालयास सुरुवातीपासूनच राजाश्रय नव्हता किंवा अत्यंत कमी प्रमाणात होता. गेल्या पंधरा वर्षापासून हा स्रोत बंद झाला आहे. त्यामुळे आज जे ग्रंथालय उभे आहे ते फक्त आणि फक्त पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या दात्यांच्या मदतीनेच उभे आहे.
ग्रंथालयाची सभासद संख्या पाचशे ते साडेपाचशेच्या जवळपास आहे. तसेच सर्वसाधारण सभासद सुद्धा ग्रंथालयात आहेत. दरवर्षी दिवाळी अंक योजना सुद्धा राबविली जाते. कोरोनापूर्वी मुक्त वाचनालयाची सोय सुद्धा उपलब्ध होती आता पुन्हा एकदा हे मुक्त वाचनालय सुरू होत आहे.
शताब्दी महोत्सवानिमित्त राबविण्यात येणारा महत्वाचा एक उपक्रम म्हणजे सध्याचा या नवीन हैदराबादच्या क्षेत्रात म्हणजे सैबराबाद क्षेत्रात महाराष्ट्रातून नोकरीसाठी इथे येणाऱ्या मराठी लोकांची संख्या खूप वाढलेली आहे. या लोकांची वाचनाची क्षुधा शमविण्यासाठी दूरस्थ अश्या वेगवेगळ्या ठिकाणी नवीन शाखा आणि फिरते ग्रंथालय तसेच डिजीटायझेशन इत्यादी योजना हाती घेण्यात येत आहेत, ग्रंथालयात लिफ्ट आणि कै काशिनाथ राव वैद्य स्मारक सभागृह नूतनीकरण करण्यात येत आहे.