नवी दिल्ली - काँग्रेसवर नाराज झालेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बुधवारी दिल्लीत भेट घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमरिंदर सिंग हे शाह यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी पोहोचले. या भेटीत शेतकरी आंदोलनावर चर्चा झाल्याचे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.
पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा 18 सप्टेंबरला राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग हे काँग्रेसवर नाराज आहेत. नवज्योत सिंग सिद्धू यांच्याविरोधात अमरिंदर सिंग यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अशातच ते दिल्लीमध्ये अमित शाह यांची भेट घेणार असल्याची चर्चा होती. तसेच ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, अमरिंदर सिंग यांचा दिल्ली दौरा हा खासगी असल्याचे त्यांच्या माध्यम सल्लागाराने स्पष्ट केले होते.
संबंधित बातमी वाचा-पंजाबमध्ये राजकीय हालचालींना वेग.. कॅप्टन अमरिंदर सिंग अमित शाह यांच्या भेटीला, भाजप प्रवेशाची शक्यता
शाह यांच्या भेटीनंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे ट्विट
अमरिंदर सिंग यांनी अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. भेटीनंतर अमरिंदर सिंग यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की शेतकरी कायद्यांबाबत भेटीमध्ये चर्चा करण्यात आली आहे. खूप दिवसांपासून लांबलेले शेतकरी आंदोलन समाप्त करण्याच्या दिशेने व शेतकरी कायदे रद्द करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. किमान आधारभूत किंमत हमी आणि पंजाबमधील धान्य उत्पादनांबाबतही चर्चा केल्याचे अमरिंदर सिंग यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.