नवी दिल्ली : Canada Visa Service Suspend : खलिस्तानवाद्याच्या हत्येवरुन भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला भारत सरकारनं जोरदार झटका दिलाय. भारतानं कॅनडातील व्हिसा सेवा बंद केलीय. कॅनडामधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या व्हिसा सुविधा वेबसाइटवर याबाबत घोषणा करण्यात आलीय. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केलेल्या आरोपांनंतर भारतानंही चोख प्रत्युत्तर दिलंय. कॅनडानं एका वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केल्यानंतर भारतानंही जशास तसं उत्तर देत मंगळवारी एका वरिष्ठ कॅनडा राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केली होती. ही व्हिसा सेवा आजपासून (21 सप्टेंबर) पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आलीय.
कॅनडातील भारतीयांना काळजी घेण्याचे आवाहन : कॅनडामधील वाढत्या भारतविरोधी कारवाया आणि राजकीयदृष्ट्या केलेले द्वेषपूर्ण गुन्हे आणि गुन्हेगारी हिंसाचार पाहता, तेथील सर्व भारतीयांनी आणि कॅनडात प्रवासाचा विचार करणार्यांनी जास्तीत जास्त काळजी घेण्याचं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं (Ministry of External Affairs) केलंय. तसंच भारतीय राजनैतिक अधिकारी आणि भारतविरोधी अजेंड्याला विरोध करणार्या भारतीय समुदायाच्या वर्गांना अलीकडील काळात लक्ष्य केलंय. यामुळं भारतीय नागरिकांना अशा घटना घडलेल्या कॅनडातील प्रदेशात आणि संभाव्य ठिकाणी प्रवास टाळण्याचा सल्लाही परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आलाय.