नारायणपूर (छत्तीसगड) :छत्तीसगडमध्ये गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांचे हल्ले तीव्र झाले आहेत. नक्षलवाद्यांची शनिवारी सुकमा येथे सुरक्षा दलासोबत जोरदार चकमक झाली. या चकमकीत ३ जवान शहीद झाले होते. आज पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी नारायणपूरमध्ये आयईडी स्फोट घडवून आणला. यात एक जवान शहीद झाला आहे.
परिसरात शोध मोहीम तीव्र केली : मिळालेल्या माहितीनुसार, ओरछा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सर्च ऑपरेशनसाठी गेले होते. दरम्यान, नक्षलवाद्यांच्या आयईडी स्फोटाच्या तडाख्यात हे जवान सापडले. यात 16 व्या बटालियनचे सीएएफ (CAF) सैनिक संजय लाक्रा शहीद झाले. ओरछा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बटुम पारा येथे ही घटना घडली आहे. परिसरात पोलिसांकडून शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी बॅनर्स लावले : ओरछा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडली मुख्य रस्त्यावर काल रात्री नक्षलवाद्यांनी बॅनर पोस्टर्स लावले. तसेच ठिकठिकाणी पॅम्पलेट देखील फेकले. त्यांनी रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब लावून रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. नक्षलवाद्यांनी लावलेल्या बॅनरमध्ये नेलनार एरिया कमिटीने केंद्र आणि राज्य सरकारवर नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप केला आहे. 11 जानेवारी 2023 रोजी सुकमा, विजापूर जिल्ह्यातील गावांमध्ये ड्रोनद्वारे हवाई बॉम्बफेक केल्याचाही आरोप होता. या हल्ल्यात सहभागी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा करण्याबाबतही नक्षलवाद्यांनी बॅनरमध्ये गोंडी भाषेत लिहिले आहे.
सुकमामध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला : सुकमाच्या जगरगुंडा येथे शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास जगरगुंडा आणि कुंदेड दरम्यान नक्षलवाद्यांनी सापळा रचून शोध घेत असलेल्या जवानांवर गोळीबार केला. यामध्ये ३ जवान शहीद झाले होते. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी सांगितले की, चकमक सुमारे दीड तास चालली. डीआरजी जवानांनी नक्षलवाद्यांशी कडवी झुंज दिली. चकमकीत एकही जवान जखमी झाला नाही. जुना रस्ता उघडण्यासाठी सैनिक बाहेर पडले होते. या दरम्यान नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला.
रजेवर आलेल्या जवानाची हत्या : शनिवारीच कांकेरच्या अंबाडा येथे लष्करी जवान मोती राम याची नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. हा जवान आसाममध्ये तैनात होता. तो रजेवर आपल्या गावी आला होते. हा जवान जत्रा पाहण्यासाठी गेला होता. या दरम्यान नक्षलवादी सिव्हिल ड्रेसमध्ये आले आणि त्यांनी जवानावर गोळीबार केला. गंभीर जखमी जवानाला अंबेडा आरोग्य केंद्रात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
नक्षलांच्या हल्यांत वाढ झाली : या पूर्वी 5 फेब्रुवारीला छत्तीसगडच्या विजापूरमधील भाजपचे अवपल्ली मंडळाचे अध्यक्ष नीलकंठ काकेम यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. 10 फेब्रुवारीला नारायणपूर जिल्ह्याचे भाजपचे उपाध्यक्ष सागर साहू यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. अशाच प्रकारच्या आणखी एका घटनेत, 11 फेब्रुवारीला नक्षल्यांनी दंतेवाडा जिल्ह्यात रामधर आलमी (43) या माजी सरपंचाची हत्या केली होती.
हेही वाचा :Sukma Encounter : सुकमामध्ये नक्षलवाद्यांच्या चकमकीत 3 जवान शहीद