जम्मू : कटराला जाणारी भाविकांची बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 10 भाविकांचा मृत्यू झाला. ही घटना जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर झज्जर कोटलीजवळ आज सकाळी घडली. या अपघातात 10 ते 12 भाविक गंभीर जखमी झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींवर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरू करण्यात आले. सुरक्षा दलाचे जवान, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य केल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
अमृतसरहून कटराला जात होती :आज सकाळी जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर झज्जर कोटलीजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाल्याची माहिती जम्मूच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. बसचे नियंत्रण सुटून ती खोल दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. बस अमृतसरहून कटराला जात होती. अपघातानंतर घटनास्थळी एकच कल्लोळ झाला. अपघात झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. तत्पूर्वी स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले.
अनेक नागरिकांचा घटनास्थळीच झाला मृत्यू :बस दरीत कोसळ्याची माहिती मिळताच सीआरपीएफ आणि इतर सुरक्षा दलही घटनास्थळी पोहोचले. सुरक्षा दलांनी रुग्णवाहिका बोलावून जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. अनेकांचा जागीच मृत्यू झाल्याने घटनास्थळावरुन मृतदेहही रुग्णालयात नेण्यात आले आहेत. क्रेनच्या सहाय्याने बस खड्ड्यातून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. बसखाली कोणीही अडकणार नाही याचीही काळजी घेण्यात आली.
अपघातग्रस्तांमध्ये बिहारच्या नागरिकांचा समावेश :या घटनेनंतर तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सीआरपीएफचे सहायक कमांडंट अशोक चौधरी यांनी ही बस अमृतसरहून येत होती आणि त्यात बिहारचे नागरिक असल्याची माहिती दिली. हे नागरिक बहुधा कटरा जाण्याचा रस्ता विसरून येथे पोहोचले असावेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नसून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.