नवी दिल्ली -वादग्रस्त बुली बाई अॅप (Bulli Bai App) प्रकरणातील मुख्य आरोपी नीरज बिष्णोईला सात दिवसांची पोलीस कोठडी (Neeraj Bishnoi send Police Custody) न्यायालयाने सुनावली आहे. सोशल मीडियावर सध्या चर्चेत असणारं आणि वादग्रस्त बुली बाई अॅप (Bulli Bai App) प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी नीरजला दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ या स्पेशल सेलनं आसाममधून अटक ( Bulli Bai app case Main conspirator arrested ) केली आहे.
नीरजनेच गिटहबवर बुली बाई अॅप तयार केलं आणि तोच या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे. या अॅपचं ट्विटर अकाउंट देखील नीरज बिष्णोईच चालवत होता, अशी माहिती स्पेशल सेलचे डीसीपी केएसपी मल्होत्रा यांनी दिली. तसेच नीरजच्या लॅपटॉप आणि मोबाईलमधूनही पुरावे मिळवले असल्याची माहिती डीसीपी केएसपी मल्होत्रा यांनी दिली.
- प्रकरणात नीरज बिष्णोईची भूमिका
नीरज बिष्णोईने ट्विटर आणि गिटहबवर बुली बाई नावाने अकाउंट तयार करून त्यावर एका महिला पत्रकाराचे फोटो टाकले होते. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणाचा तपास दिल्ली सायबर सेलकडून सुरू आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान दिल्ली पोलिसांना नीरज हा यामागचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले. या माहितीवरून पोलीस पथकाने त्याला आसाममधून अटक केली आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी त्याला देण्यात आली आहे.
बुली बाई प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. श्वेता सिंह, शुभम रावत, विशाल कुमार आणि गुरुवारी अटक केलेला नीरज अशी या आरोपींची नावे आहेत. तीघांना मुंबई पोलिसांनी तर एका आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. पहिल्यांदा विशालला अटक करण्यात आली होती. त्यानंतर श्वेता सिंह आणि शुभम रावतला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. यानंतर नीरजला अटक झाली आहे.
नीरज बिष्णोई असे या मुख्य आरोपीचे पूर्ण नाव असून तो 20 वर्षाचा आहे. आसामच्या जोरहाटमधील दिगंबर भागातील तो रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तर भोपाळमधील वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये तो बीटेकचे शिक्षण घेत आहे.