चंदीगड : पंजाबमधील तरनतारनमध्ये सीमा सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचे नापाक मनसुबे उधळून लावले आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या एका संशयित पाकिस्तानी ड्रोनला सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी पाडले आहे. बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. बीएसएफ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना सीमेपलीकडून ड्रोन येत असल्याचा आवाज आला होता.
पाकिस्तानी ड्रोन पाडले -ड्रोनच्या आवाजाच्या दिशेने बीएसएफ जवानांनी गोळीबार केला. काही वेळ गोळीबार केल्यानंतर ड्रोनचा आवाज बंद झाला. त्यानंतर बीएसएफ आणि पंजाब पोलिसांच्या जवानांनी संपूर्ण परिसर सील केला आणि संयुक्त शोध मोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान जवानांना शनिवारी सकाळी लखना गावातील एका शेतात ड्रोन पडलेले दिसून आले. त्यानंतर ते जप्त केले आहे. बीएसएफने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, तरनतारन जिल्ह्यातील लखना गावात बीएसएफच्या जवानांनी भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी ड्रोनला पाडले आहे. पाकिस्तानचे नापाक मनसुबे पुन्हा एकदा बीएसएफने हाणून पाडले आहेत.