अमृतसर (पंजाब) :आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या ( BSF) जवानांनी पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील चहारपूर गावात पाकिस्तानमधून भारतीय हद्दीत घुसलेल्या ड्रोनला पाडले. नंतर परिसराची नाकेबंदी करण्यात आली, पोलीस आणि संबंधित सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर होत्या. त्यांनी शोधमोहीमही सुरू केली आहे. ( BSF shot down a drone in Amritsar Punjab )शोध मोहिमेदरम्यान, बीएसएफ जवानांनी गावाजवळील सीमेवरील कुंपणाच्या एका बाजूला असलेल्या शेतात खाली पडलेल्या पांढऱ्या रंगाच्या पॉलिथिनमधील संशयित वस्तूसह नुकसान झालेल्या स्थितीत 1 हेक्साकॉप्टर जप्त केले आहे. बीएसएफचे जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
बीएसएफ जवानांनी केला गोळीबार :भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानचे ड्रोन पुन्हा एकदा घुसखोरी करताना दिसले आहे. पंजाबच्या अमृतसरमध्ये सतर्क सीमा सुरक्षा दलांनी चाहरपूर गावात घुसखोरी करणाऱ्या ड्रोनला पकडले, त्यानंतर विलंब न करता त्यावर गोळीबार सुरू केला. ड्रोनचे नुकसान होऊन ते जमिनीवर पडेपर्यंत बीएसएफ जवानांनी गोळीबार केला. जेव्हा ड्रोन खराब झाले आणि जमिनीवर पडले तेव्हा सुरक्षा दलांना एक पॉलिथिनबॅग बांधलेली दिसली, ज्यामध्ये संशयास्पद वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. मात्र या बॅगेत काय होते, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. संशयास्पद वस्तू शोधून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी बीएसएफने पोलिसांना आणि इतर यंत्रणांना घटनेची माहिती दिली आहे.
याआधी दोन किलो हेरॉईन जप्त : याआधी शनिवारी पंजाब पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली, त्याच्याकडून आठ चिनी पिस्तूल, 60 गोळ्या आणि दोन किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. पंजाब पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की आरोपीचे नाव परमजीत सिंग असे असून तो तरनतारन जिल्ह्यातील हवालियन गावचा रहिवासी आहे. पाकिस्तानातून ड्रोनद्वारे शस्त्रास्त्र, दारूगोळा आणि ड्रग्जची तस्करी होणार असल्याची ठोस माहिती पोलिसांना होती, असे त्यांनी सांगितले. ड्रोनने शुक्रवारी ही खेप भारतीय हद्दीत टाकली आणि परमजीत सिंगने शनिवारी ती परत मिळवली. परमजीत सिंगला रविवारी पोलिसांच्या पथकाने अजनाळा रोडवर त्याची कार अडवल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
बीएसएफची हिवाळी रणनीती : सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर (आयबी) आपली हिवाळी रणनीती लागू केली आहे. बीएसएफचे महानिरीक्षक (आयजी) डीके बुरा यांनी गेल्या आठवड्यात एका निवेदनात म्हटले होते की, गेल्या तीन-चार महिन्यांत ड्रोनद्वारे शस्त्रे, स्फोटके आणि ड्रग्स सोडण्याच्या घटनांमध्ये घट झाली आहे. ते म्हणाले, या संदर्भात काय उपाययोजना केल्या आहेत हे मी माध्यमांसमोर उघड करू शकत नाही, परंतु अनेक पावले उचलली गेली आहेत. बुरा म्हणाले की, हिवाळ्यात धुक्यामुळे उद्भवलेल्या आव्हानासाठी बीएसएफ देखील पूर्णपणे तयार आहे. सीमेवर सुरक्षा आणि टेहळणी उपकरणांसह जवान तैनात करण्यात आले आहेत. आम्हाला खात्री आहे की आम्ही सीमेपलीकडून घुसखोरी होऊ देणार नाही.