बेलगावी -कर्नाटक भाजपमध्ये सध्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे वाढते वय पाहता राज्यात नेतृत्व बदलाचा विचार सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येडियुरप्पा यांच्या जागी नवीन मुख्यमंत्री कोण असेल?; याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र पक्षनेतृत्वाकडून अधिकृत नावाची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. मात्र नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव आज संध्याकाळपर्यंत जाहीर होईल, असे संकेत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिले आहेत.
बेलगावमधील सांबरा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी म्हटले की, आज संध्याकाळपर्यंत राज्यातील नेतृत्व बदलाचा आदेश येऊ शकतो. दलित मुख्यमंत्री नियुक्तीबाबत पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला आहे. मला कोणतीच चिंता नाही”, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिले आहेत.