हैदराबाद -बोनालू किंवा देवी महाकाली बोनुलु हा एक हिंदू सण आहे. ज्यामध्ये देवी महाकालीची पूजा केली जाते. 'बोनालू' हा सण ( Hyderabad Bonalu festival ) प्रामुख्याने तेलंगणा राज्यातील जुळ्या शहरे, हैदराबाद आणि सिकंदराबाद आणि त्याच्या लगतच्या भागात दरवर्षी 'आषाढ' म्हणजे जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात साजरा केला जातो. तेलंगणा व्यतिरिक्त, भारताच्या इतर अनेक भागांमध्ये देखील हा उत्सवात साजरा होतो. हा द्रविड संस्कृतीचा एक पारंपारिक हिंदू सण आहे, जो देवी महाकाली किंवा यल्लम्मा यांना समर्पित आहे. उत्सवाच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी येल्लम्मा देवीची विशेष पूजा केली जाते. यामध्ये रोगांपासून रक्षण करून, सुख-समृद्धी मिळावी अशी देवीला प्रार्थना केली जाते. यावेळी चांगले पीक, समृद्धी आणि संसर्गजन्य रोगांपासून संरक्षणासाठीही प्रार्थना केली जाते.
अशी सुरू झाली प्रथा - लोकांचा असा विश्वास आहे की महाकालीच्या कोपामुळे महामारी उद्भवली आणि तीला शांत करण्यासाठी बोनालू उत्सव सुरू झाला. असे मानले जाते की, 1813 मध्ये हैदराबाद आणि सिकंदराबाद या दोन मोठ्या शहरांमध्ये कॉलरा हा संसर्गजन्य रोग वेगाने पसरला. ज्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला. हा आजार टाळण्यासाठी शहरातील सैन्याने मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातील महाकालीच्या मंदिरात पूजा केली. या रोगाचा त्रास टळला तर शहरात माँ काली मूर्तीची प्रतिष्ठापना करू, अशी प्रतिज्ञा केला होती. तेव्हा पूजेनंतर शहरातून कॉलराचा संसर्ग हळूहळू कमी होत गेला, त्यानंतर लष्कराच्या जवानांनी येथे माँ काली मूर्तीची स्थापना केली. तेव्हापासून हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो.
मिरवणुकीपूर्वी 'रंगण' ही धार्मिक प्रक्रिया केली जाते - महाकालीच्या विशेष पूजेत मोठी मिरवणूक काढली जाते. यामध्ये लाखो भाविक सहभागी होतात. मिरवणुकीदरम्यान, स्त्रिया मातीच्या भांड्यात डोक्यावर तांदूळ, दूध आणि गुळाचा नैवेद्य घेऊन मंदिरात जातात आणि भक्त त्यांच्या मागे लागतात. या उत्सवात महिला आणि पुरुष पारंपरिक पोशाख परिधान करतात. या उत्सवात महाकाली देवीला प्रसन्न करण्यासाठी प्राण्यांचा बळीही दिला जातो. यानंतर कुटुंबातील सदस्य मिळून हा प्रसाद खातात. बोनालू उत्सवादरम्यान एक विशेष धार्मिक प्रक्रिया पाळली जाते जी 'रंगण' म्हणून ओळखली जाते. यामध्ये एक महिला मातीच्या एका मोठ्या भांड्यावर उभी आसते.असे मानले जाते की त्या स्त्रीमध्ये महाकाली आली आहे, जी लोकांना तिचे भविष्य सांगते. मिरवणुकीपूर्वी ही धार्मिक प्रक्रिया केली जाते. ही मिरवणूक हैदराबादच्या गोलकोंडा येथील श्री जगदंबिका मंदिरापासून सुरू होऊन सिकंदराबाद येथील उज्जयिनी महाकाली मंदिरात आणि नंतर लाल दरवाजा माता मंदिरात संपते.