मुंबई/चंदीगड/बेंगळुरू/जयपूर : राज्यसभा निवडणूक ( Rajya Sabha ) केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि पियुष गोयल, काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला आणि जयराम रमेश आणि शिवसेनेचे संजय राऊत हे उमेदवार सहज त्यांना आवश्यक असलेली मते मिळवून सहज निवडून आले. चार राज्यांमध्ये 16 जागांसाठी मतदान झाले होते. क्रॉस व्होटिंग आणि नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी सत्तारुढ आणि विरोधकांकडूनही झाल्याने महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये ( Hariyana ) मतमोजणीला तब्बल आठ तास उशीर झाला.
भाजपचे दोन उमेदवार आणि भाजप पुरस्कृत एक अपक्ष उमेदवार अशा तिघांचा विजय या निवडणुकीत लक्षवेधी ठरला. महाराष्ट्रात सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चुरशीची लढाई होती. शिवसेनेच्या संजय पवार यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा होता. तर भाजपने धनंजय महाडिक यांना या लढतीत उभे केले होते. मध्यरात्री उशीरा झालेल्या मतमोजणीत धनंजय महाडिक यांनी संजय पवार यांना पराभूत केल्याचे स्पष्ट झाले. या पराभवामुळे महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. महाराष्ट्रातून भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राज्यातले माजी मंत्री अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक, शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी हे विजयी झाले आहेत.
महाराष्ट्रातील या विजयाचे शिल्पकार भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यानंतर ट्विट केले की, निवडणुका या फक्त लढण्यासाठी नाहीत तर जिंकण्यासाठी असतात. हरियाणामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला जेथे भाजपचे कृष्णलाल पनवार आणि भाजपने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा यांनी विजय मिळविला. तर काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री अजय माकन यांचा पराभव झाला. पनवर यांना 36 मते मिळाली तर शर्मा यांना पहिल्या पसंतीची 23 मते मिळाली. दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे त्यांचा विजय नोंदविला गेला.