नवी दिल्ली -भाजपकडून फायद्यासाठी धर्माचा वापर केला जात आहे. भाजपला हिंदुत्वाची काळजी नाही. ते केवळ स्वार्थासाठी धर्माचा वापर करत आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी भाजपवर केली आहे. ते पक्षाच्या महिला मेळाव्यात बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले, की हे खोटे हिंदू आहेत. हिंदू धर्माचा प्रयोग करत आहेत. हे हिंदू नाहीत. तर धर्माची दलाली करतात. ते स्वत:ला हिंदू पक्ष म्हणून घेतात. मात्र, लक्ष्मी व दुर्गा यांच्यावर हल्ले करतात. देवतांना संपवितात. त्यानंतर ते हिंदू असल्याचे सांगतात. कोणत्या प्रकारचे ते हिंदू आहेत? लक्ष्मी आणि दुर्गा हे महिला सशक्तीकरणाचे प्रतिक आहे. मात्र, सरकार हे नोटाबंदी, जीएसटी, शेतकरी कायदे आणि महागाईने हे महिला सशक्तीकरण संपवित आहे.
हेही वाचा-2020 मध्ये रोज 77 बलात्काराच्या घटना; राजस्थानचा पहिला तर महाराष्ट्राचा चौथा क्रमांक
पुढे राहुल गांधी म्हणाले, की दिवाळी जवळ येत आहे. मात्र, सरकारच्या धोरणामुळे लोकांचा खिसा रिकामा आहे. हे पैसे पंतप्रधानांच्या मित्राकडे वळती झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महिलांच्या सामर्थ्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा राहुल गांधींनी आरोप केला. काँग्रेसने देशाला महिला पंतप्रधान दिल्या होत्या. मात्र, त्यांच्याकडे समान वागणुकीकरिता जागा नाही. काँग्रेसची विचारसरणी वेगळी आहे. काँग्रेस कार्यकर्ता म्हणून इतर विचारसरणीशी तडजोड करू शकतो. मात्र, भाजप आणि आरएसएसच्या विचारसरणेशी तडजोड करू शकत नाही. गांधींच्या काँग्रेस, गोडसे आणि सावरकरांच्या विचारणसीत काय फरक आहे? हा आमच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न आहे.