कोलकाता - काही दिवसापूर्वी पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाचा धुव्वा उडवत सत्ता काबीज केली. निवडणुकीत भाजपाच्या पराभवानंतर पक्षात मोठा गोंधळ उडालेला आहे. तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केलेल्या मुकुल रॉय यांनी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकात्ता येथे त्यांनी भेट घेतली होती.
काही दिवसांपूर्वी तृणमूलचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सौगत रॉय यांनीही मुकुल रॉय पक्षात दाखल होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. कोरोनाची लागण झालेल्या मुकुल रॉय आणि त्यांची पत्नी कृष्णा रॉय यांची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी फोनवरून विचारपूस केली होती. आता मुकुल रॉय यांचा पक्षबदलाचा निर्णय भाजपाला मात्र मोठा धक्कादायक ठरला आहे. भाजपाला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये १८ जागा मिळवण्यात यश आलं
कधी केला होता भाजपामध्ये प्रवेश?
मुकुल रॉय यांनी सर्वात आधी टीएमसीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी 2017 मध्ये भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. सुवेंदू अधिकारी यांना ज्याप्रकारे मान सन्मान देण्यात आला. तसा भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर मुकुल रॉय यांना मिळालेले नाही. त्यामुळे ते भाजपावर नाराज होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर चर्चा देखील केली होती.
कोण आहेत मुकुल रॉय?
मुकुल रॉय तृणमूल काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. ममता बॅनर्जी यांच्यासोबत त्यांनी टीएमसी स्थापित करण्यासाठी मेहनत घेतली होती. युपीए सरकारच्या काळात त्यांनी केंद्रात मंत्रिपद सांभाळली. मात्र, 2015 मध्ये शारदा आणि नारदा घोटाळ्यात अडकल्यानंतर तृणमूलने त्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर ते टीएमसीवर नाराज असल्याच्यी माहिती आहे. अखेर 2017 मध्ये त्यांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देत भाजपाची वाट धरली होती. नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत त्यांनी कृष्णानगर दक्षिणमध्ये विजय मिळवला आहे. मात्र, भाजपावर नाराज झाल्याने आता पुन्हा त्यांनी घरवापसी केली.