भाजप कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज पाटणा (बिहार) : भाजपने आज (13 जुलै) तीन मुद्द्यांवर विधानसभेवर मोर्चा काढला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना डाक बंगला चौकात अडवून लाठीचार्ज केला. यावेळी पोलिसांनी भाजप खासदारावरही लाठीमार केला आहे. मी खासदार आहे. माझ्यावर लाठीचार्ज करु नका, अशी विनंती भाजप खासदार पोलिसांकडे करत होते. तरीही खासदारांच्या बोलण्याकडे पोलिसांनी लक्ष न देता लाठीचार्ज सुरू केला. त्यामुळे भाजप खासदार जनार्दन सिंह सिग्रीवाल यांना गंभीर दुखापत झाली आहे.
राज्य सरकार हे आंधळे आणि बहिरे सरकार आहे. हे लाठ्या-गोळ्यांचे सरकार आहे. माझ्यावर लाठीचार्ज होत असताना मी पोलिसांना सांगितले की मी खासदार आहे, तरीही माझ्यावर लाठीचार्ज झाला. आता या प्रकरणाची तक्रार मी राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे करणार आहे. हे सरकार हुकूमशाही बनले आहे - जनार्दन सिंह सिग्रीवाल, खासदार, भाजप
भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू - मोर्चादरम्यान पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये एका भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी डाकबंगला चौकात बळाचा वापर केला, त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्याला जीव गमवावा लागला आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिली आहे. तसेच ही हत्या असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी म्हटले आहे.
मृत भाजप नेता कोण? - विजय कुमार सिंह असे मृत्यू झालेल्या भाजप नेत्याचे नाव आहे. ते जहानाबादचे शहर भाजप सरचिटणीस होते, त्यांचे वय सुमारे 40 वर्षे असल्याचे सांगितले जाते. विजय कुमार यांच्या मृत्यूनंतर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तसेच पक्षाच्या नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि सुशील मोदी यांच्यासह सर्व नेत्यांनी ट्विट करून बिहार सरकारवर हल्लाबोल केला आहे.
भाजप खासदारावर लाठीचार्ज - भाजप खासदार जनार्दन सिग्रीवाल हे देखील त्यांच्या समर्थकांसह विधानसभेच्या मोर्चात सहभागी झाले होते. त्यांचे कार्यकर्ते डाक बंगला चौकात पोहोचल्यावर पोलिसांनी सर्वांना रोखले. काही वेळातच पोलिसांनी पाण्याचा मारा सुरू केला. तसेच यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या आहेत. यावेळी पोलिसांनी लाठीचार्जही सुरू केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी खासदार सिग्रीवाल यांना दुकानाच्या शटरजवळ नेले. तोपर्यंत पोलिसही लाठीचार्ज करत खासदारांजवळ पोहोचले. काही पोलिसांनी खासदार सिग्रीवाल यांना घेरले होते. मी खासदार आहे, लाठीमार करू नका, असे ते पोलिसांना सांगत होते.
भाजपचा सरकारवर हल्ला -लाठीचार्ज केल्याने भाजप खासदार जनार्दन सिग्रीवाल जखमी झाल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी भाजप नेते आणखीनच संतापले आहेत. त्यांनी नितीश कुमार सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपने तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
जेपी नड्डा यांचा बिहार सरकारवर हल्लाबोल - भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विट करून बिहार सरकारवर हल्लाबोल केला आहे. पाटणा येथे भाजप कार्यकर्त्यांवर झालेला लाठीचार्ज हा राज्य सरकारच्या अपयशाचा आणि संतापाचा परिणाम आहे. भ्रष्टाचाराचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी महाआघाडीचे सरकार लोकशाहीवर हल्ला करत आहे. आरोपपत्र दाखल झालेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री त्यांची नैतिकताही विसरले असल्याचे जेपी नड्डा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.