नवी दिल्ली :आगामीकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मंगळवारी 189 उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत राज्यातील उमेदवारांच्या नावांबाबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर केली.
52 नवे उमेदवार : माध्यमांशी बोलताना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या 189 उमेदवारांपैकी 52 उमेदवार नवीन आहेत. ते म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे शिगगाव मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांचा मुलगा विजयेंद्र शिकारीपुरा मतदारसंघातून, तर राज्यमंत्री बी श्रीरामुलू बेल्लारी ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. कर्नाटक विधानसभेसाठी 10 मे ला मतदान होणार असून तर 13 मे ला मतमोजणी होणार आहे.
राज्यातील नेत्यांची अमित शाहंसोबत बैठक : उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सोमवारी दिवसभर विचारमंथन केले होते. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या (CEC) नुकत्याच झालेल्या बैठकीत आलेल्या सूचनांचा या मंथनात समावेश करण्यात आला होता. अमित शाह, जेपी नड्डा, बसवराज बोम्मई, बीएस येडियुरप्पा आणि कर्नाटकातील इतर नेते या बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर अमित शाह अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्याला रवाना झाले.
भाजपचे 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य : बोम्मई यांनी रविवारी सीईसी बैठकीनंतर सांगितले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही सूचना दिल्या आहेत. विविध सूचनांनुसार पक्ष काम करत असल्याचे त्यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. तथापि, त्यांनी सूचना किंवा इनपुटचे स्वरूप स्पष्ट केले नाही. निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर 13 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल आहे. कर्नाटकातील विधानसभेच्या एकूण 224 जागांपैकी किमान 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे.
हेही वाचा :Sharad Pawar On Adani Group : अदानी प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीला आमचा विरोध नाही; शरद पवारांचे स्पष्टीकरण