लखनौ - भाजपाने उत्तरप्रदेशमधील निवडणुका समोर ठेऊन महत्त्वपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील नेत्यांचं पारड जड आहे. कार्यकारिणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा समावेश आहे. याशिवाय उत्तरप्रदेशातील इतर आठ नेत्यांना देखील स्थान देण्यात आले आहे. तर विशेष म्हणजे खासदार वरूण गांधी आणि मेनका गांधी यांना या कार्यकारिणीतून वगळण्यात आले आहे.
भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित अनेक नेत्यांची लागली वर्णी -
उत्तरप्रदेशमधील मंत्री ब्रजेश पाठक, मंत्री स्वामी प्रसाद मौर्य, मंत्री दारा सिंह चौव्हान, मुख्तार अब्बास नकवी, संजीव बालियान, संतोष गंगवार आणि साध्वी निरंजन ज्योती, खासदार अनिल जैन यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश आहे.
उत्तरप्रदेशातून अकरा सदस्य -
भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकुण 80 सदस्य आहेत. त्यापैकी एकट्या उत्तरप्रदेशातून अकरा जणांची निवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये तीघांना उच्च पद देण्यात आले आहे. यात स्वत: नरेंद्र मोदी, मुरली मनोहर जोशी आणि राजनाथ सिंह यांचा समावेश आहे.
भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित सर्व जातींचा समावेश -
राष्ट्रीय कार्यकारिणीत दलित, ब्राम्हण, जाट, कुर्मी, महिला, क्षत्रिय, मागासवर्गीय आणि मुस्लीमांना स्थान देण्यात आले आहे. सर्व मतदारांना खूष करण्यासाठी भाजपाची ही रणनिती असल्याचे बोलले जात आहे.
वरूण गांधी आणि मेनका गांधींना वगळले -
भाजपात अनेक वर्षापासून असणारे वरूण आणि मेनका गांधींना राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आले आहे. वरूण गांधी यांनी लखीमपूर हिंसाचारात शेतकऱ्यांची बाजू घेत पक्ष नेतृत्वाला आव्हान दिले होते. तसेच केंद्र सरकारकडे या घटनेच्या चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे नाराज झालेल्या भाजपा नेतृत्वाने त्यांना वगळले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वरूण गांधी यानंतर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.