पाटणा : बागेश्वर धाम बाबा आपल्या बेधडक वक्तव्याने नेहमी चर्चेत राहतात. सध्या बागेश्वर धाम बाबा हे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. बिहार सरकारने बागेश्वर धाम बाबांवर दंड ठोठावला आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे बागेश्वर धाम बाबांवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. बागेश्वर बाबा बिहारमधून मध्य प्रदेशाकडे रवाना झाले असले, तरी त्यांच्यावर ठोठावण्यात आलेल्या या दंडाने ते अद्यापही बिहारमध्ये चर्चेत आहेत.
मनोज तिवारी चालवत होते गाडी : बागेश्वर धाम बाबा उर्फ पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे पाटणा विमानतळावरून तरेत पाली मठात पोहोचले होते. ही गाडी भाजप नेते मनोज तिवारी चालवत होते. मात्र यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप बागेश्वर धाम बाबांवर करण्यात आला आहे. पाटणा पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीची चौकशी केली असता हे आरोप खरे असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी बागेश्वर धाम बाबांवर कारवाई केली.
बागेश्वर धाम बाबांवर दंड :बागेश्वर धाम बाबांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केले नाही. त्यांची गाडी भाजपचे खासदार मनोज तिवारी चालवत असल्याची तक्रार करण्यात आली होती. बाबा बाजूला बसले होते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह मागच्या सीटवर बसले होते. त्या गाडीत ना मनोज तिवारींनी सीट बेल्ट लावला होता ना बागेश्वर धाम बाबांनी सीट बेल्ट लावला होता. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल दंड आकारण्यात आला आहे.