पाटणा : छपरा दारू प्रकरणात (Chapra Liquor Case) 70 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिक पोलीस-प्रशासनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले नाही, तर नितीश सरकारवरही जोरदार टीका झाली. या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने छापे टाकून अनेकांना अटक केली. आता या प्रकरणात होमिओपॅथिक औषधापासून दारू बनवणाऱ्या मास्टरमाईंडला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. (Mastermind of Chapra liquor case arrested). राम बाबू असे या सूत्रधाराचे नाव असून त्याचे वय 35 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक अहवालानुसार, आरोपींनी त्यात रसायन मिसळून दारू तयार केली होती, त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला होता. (Bihar Fake Liquor Case).
बनावट दारूच्या मुख्य पुरवठादारास अटक : छापरा येथे बनावट दारू प्यायल्याने अनेकांचा मृत्यू झाला. त्या भेसळयुक्त दारूचा मुख्य पुरवठा करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मुख्य पुरवठादार संजीव कुमार याला वाराणसी येथून अटक केल्यानंतर या घटनेत आतापर्यंत 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासात समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे या घटनेत सहभागी असलेल्या गुन्हेगारांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी पोलिस सातत्याने छापे टाकत आहेत.