पाटणा : बिहारच्या नालंदा आणि सासाराममध्ये हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. या घटनेची गंभीरता पाहून डीजीपी आरएस भाटी यांनी आता दोन्ही जिल्ह्यांची कमान आपल्या हाती घेतली आहे. डीजीपींनी सध्या आपल्या टीमसह नालंदामध्ये हजर आहेत. याशिवाय आयुक्त कुमार रवी आणि डीआयजी राकेश कुमार राठी हे देखील हिंसाचाराच्या दिवसापासून बिहारशरीफमध्ये ठाण मांडून आहेत. यासोबतच एटीएसचे एसपी संजय कुमार सिंह यांना नालंदाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी दिली आहे. ते संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
सासाराममध्ये पुन्हा बॉम्बस्फोट : सासारामच्या मोची टोला येथे पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाला आहे. स्फोटानंतर एसएसबीचे जवान घटनास्थळी पोहचले. त्यानंतर त्यांनी तेथे फ्लॅग मार्च काढला. एएसआय रामनरेश सिंह यांनी सांगितले की, 'आम्ही ड्युटीवर होतो. मी मोठा आवाज ऐकला. तो बॉम्ब होता की फटाके हे स्पष्ट होऊ शकले नाही. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा घराला धुराने वेढलेले दिसले. तेथे कोणीच दिसत नव्हते'.
109 जणांना अटक : घटनेबद्दल बोलताना एक स्थानिक तरुण म्हणाला की, 'पहाटे 4:52 वाजता स्फोट झाला. आम्ही बाहेर आलो तेव्हा तेथे काही पोलीस आले होते. काही बूट घालत होते तर काही झोपले होते. त्यांनी देखील स्फोटाचा आवाज ऐकला होता. प्रशासनाने त्यांना झोपायला पाठवले आहे का? त्यांच्या निष्काळजीपणामुळे 4 जण आले आणि बॉम्ब फेकून निघून गेले. यामुळे आम्ही सगळे घाबरलो आहोत'. डीजीपी आरएस भाटी म्हणाले की, 'हिंसाचारात सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही. निमलष्करी दलाच्या नऊ कंपन्या आणि तैनात पोलिसांच्या पथकाला आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी बिहारशरीफला पाचारण करण्यात आले आहे. चौकशीनंतर दोषींवर कारवाई केली जाईल. दोन्ही जिल्ह्यात एकूण 109 जणांना अटक करण्यात आली आहे.