महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नांदेड जिल्ह्यात गत 24 तासांत सरासरी 7.2 मि.मी. पावसाची नोंद - kolhapur rain

Big Breaking
Big Breaking

By

Published : Jun 17, 2021, 7:12 AM IST

Updated : Jun 17, 2021, 10:26 PM IST

21:19 June 17

नांदेड जिल्ह्यात गत 24 तासांत सरासरी 7.2 मि.मी. पावसाची नोंद

नांदेड - जिल्ह्यात गत 24 तासांत सरासरी 7.2 मि.मी. पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 152.7 मि.मी. पाऊस झाला आहे.
 

21:16 June 17

सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 143.2 मि.मी पावसाची नोंद

सातारा -जिल्ह्यात बुधवारी दिवसभरापासून आज सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 46.8 मि.मी पाऊस पडला. आतापर्यंत सरासरी 143.2 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. 

जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे,

सातारा- 40 (146.6) मि. मी., जावळी- 80.1 (230.9) मि.मी., पाटण- 82.3 (170.3) मि.मी., कराड- 98.9 (203.7) मि.मी., कोरेगाव-20.4 (104.4) मि.मी., खटाव- 15.1 (78.0) मि.मी., माण- 4.6 (57.2) मि.मी., फलटण- 2.8 (64.1) मि.मी., खंडाळा- 6.8 (77.5) मि.मी., वाई-18.7 (128.4) मि.मी., महाबळेश्वर- 143 (389) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

कोयना धरणात आजअखेर 31.67 टीएमसी (26.51 टक्के) एवढा पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण क्षेत्रात झालेल्या पावसाची आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी,

251 (443) मि.मी.

19:18 June 17

नागपूर शहरात दमदार पावसाला सुरुवात; पुढील तीन तास मुसळधार पावसाचा इशारा

नागपूर - चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज नागपूर शहरात दमदार पावसाचे आगमन झाले आहे. निर्धारित वेळेच्या आठ दिवस आधी म्हणजे ९ जून रोजी नागपूरसह विदर्भात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर वातावरणातील उकाडा कमी झाला होता. मात्र, पावसात खंड पडत असल्याने परत उकाडा वाढायला सुरवात झाली होती. आज सुमारे दोन तास पावसाने दमदार बॅटिंग केल्याने नागपूरकर सुखावले आहेत. 

17:20 June 17

मराठा आरक्षण प्रकरणी सह्याद्री अतिथीगृहावर महत्वाची बैठक

मुंबई -मराठा आरक्षण प्रकरणी सह्याद्री अतिथीगृहावर महत्वाची बैठक होणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली थोड्याच वेळात बैठक सुरू होणार. संभाजी राजे भोसले यांची विशेष उपस्थिती असणार आहे. सह्याद्रीवर खासदार सुनील तटकरे, विनायक राऊत दाखल झाले असून मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, सदस्य एकनाथ शिंदे, दिलीप वळसे - पाटील, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, सखल मराठा समाजाचे नेते, पदाधिकारी आदी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

15:33 June 17

राज्यपाल भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही - महपौर पेडणेकर

मुंबई -वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्यपालांची भेट घतेली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, वडीलकीच्या नात्याने मोठे असलेल्या राज्यपालांना शुभेच्छा दिल्या.

मालमत्ता करात वाढ नाही

मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. नागरिक त्रस्त असल्याने मालमत्ता करात वाढ केली जाणार नाही. तसेच, मनसेने दिलेल्या व्हिडिओबाबत चौकशी करण्यास सांगितले आहे. मनसेकडे काम नसल्याने ते आरोपच करत राहणार. कोणत्या आरोपाला मीडियाने महत्व द्यायचे, ते ठरवावे. मात्र, आम्ही काम करतच राहणार, असे महापौरांनी सांगितले. 

15:23 June 17

डॉ. सुनील देशमुख पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार

अमरावती - माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतणार असून 19 जूनला मुंबईच्या टिळक भवन येथे आयोजित सोहळ्यात ते काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश घेणार आहेत. डॉ. सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे अमरावतीच्या राजकारणात खळबळ उडाली असताना देशमुखांमुळे काँग्रेसला विदर्भात दमदार नेता मिळणार आहे.

14:10 June 17

मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे अभीष्टचिंतन केले. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, शिवसेना पक्ष सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. 

14:07 June 17

यवतमाळमध्ये 19 लाख रुपये किमतीचे बोगस बीटी बियाणे जप्त

यवतमाळ- 19 लाख रुपये किमतीचे 864 किलो बोगस बीटी बियाणे जप्त करण्यात आली आहेत. यवतमाळच्या वटबोरीमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस गस्तीवर असतांना जीपमध्ये कपाशीचे बियाणे आढळून आले. याप्रकरणी रवींद्र जनार्दन बंदाटे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली.

12:11 June 17

मनसे नेते संदीप देशपांडेंचा शिवसेनेवर हल्लाबोल, मुंबई पालिकेत नालेसफाई कामात घोटाळ्याचा केला आरोप

मुंबई -महानगरपालिकेमधील नालेसफाईच्या घोटाळ्यासंदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषद घेत विरप्पण गॅंगचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये त्यांनी मुंबई महानगरपालिका कशा पद्धतीने गाळ उपसण्याचे काम करते आणि त्यामध्ये कशाप्रकारे भ्रष्टाचार होत आहे, या सर्व संदर्भात त्यांनी पुराव्यानिशी आज पत्रकार परिषदेत शिवसेनेवर हल्लाबोल चढविला आहे.

11:41 June 17

काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा, राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढणार- संजय राऊत

मुंबई- काँग्रेस आगामी विधानसभा निवडणूक एकटी लढवेल असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्पष्ट केले आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीए. राऊत म्हणाले की 'काँग्रेस महाविकास आघाडी सरकारमधील एक घटक आहे. त्यांना स्वबळावर निवडणूक लढवायची असल्यास ते लढू शकतात. त्यांचा निर्णय झाल्यानंतर उर्वरित दोन पक्ष म्हणजेच शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत निवडणूक लढवायची की स्वतंत्र लढवायची याबाबत निर्णय घेतील.'

11:38 June 17

नागपुरात कोळसा व्यापाऱ्याच्या कार्यालयावर आणि घरी ईडीची छापेमारी

नागपूर- नागपुरात ईडीने बुधवारी संध्याकाळी तीन ठिकाणी चौकशी केली. दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या कार्यालयात व घरी चौकशी केल्याची माहिती आहे. हा व्यापारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संपर्कात असल्यामुळे चौकशी झाल्याची माहिती मिळते आहे, मात्र याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. मुंबईच्या ईडी टीमने ही कारवाई केली आहे.  

11:36 June 17

पालघरच्या डेहणेमध्ये फटाके कंपनीत स्फोट

पालघर- वाणगाव जवळील डेहणे येथील फटाके कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. स्फोटाच्या भीषण आवाजाने 15 ते 20 किलोमीटरचा परिसर हादरला  आहे. फटाक्यात वापरल्या जाणाऱ्या दारूचा ब्लास्ट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून काही कामगार जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. 

11:35 June 17

बीएचआर प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून राज्यभर छापेमारी; 12 जणांना अटक

जळगाव- राज्यभर गाजलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून आज (गुरुवारी) राज्यभरात ठिकठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईत सकाळपासून आतापर्यंत 12 संशयितांना अटक केली आहे.

09:02 June 17

कोल्हापुरात मुसळधार पाऊस, जिल्ह्यातील ४३ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर- जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाचा जोर इतका आहे की गेल्या 24 तासांत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 12 फुटांनी वाढ झाली असून जिल्ह्यातील 43 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात अद्यापही पावसाची संततधार कायम आहे. 

08:20 June 17

पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे जळगावातील बड्या उद्योजकांवर छापे

जळगाव- पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे जळगाव शहरासह जामनेरात छापे टाकले आहेत. बडे उद्योजक व व्यावसायिकांकडे ही छापेमारी झाली असून, पोलिसांनी काहींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बीएचआर प्रकरणाशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. या आधी काही महिन्यांपूर्वी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीएचआर प्रकरणी जळगावात छापे टाकले होते. त्यावेळी काहींना अटक झाली होती. या गुन्ह्यात बीएचआर पतसंस्थेचा अवसायक जितेंद्र कंडारे, उद्योजक सुनील झंवर हे संशयित फरार आहेत. बीएचआर प्रकरणाच्या चौकशीत आता पुन्हा जळगाव जिल्ह्यातील काही उद्योजक व व्यावसायिकांची नावे समोर आल्याने हे छापासत्र राबवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

06:02 June 17

पुराच्या पाण्यातून पूल ओलांडणारे दोघं गेले वाहून, एकाला वाचवण्यात यश

जालना- बुधवारी सायंकाळी भोकरदन परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच अवघडराव सावंगी, पारध परिसरात हा जोरदार पाऊस झाल्याने नदी नाले ओसंडून वाहू लागले होते. या पावसामुळे अवघडराव सावंगी गावालगत असलेल्या नदीला पूर आलेला असतांना काही कामानिमित्त बाहेर पडलेले सख्खे चुलत भाऊ शायद सईद सय्यद (१९) आणि सलीम सईद सय्यद (२१) हे दोघे हे नदीवरील पुल ओलांडत असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. त्यापैकी एकाचा मृत्यु झाला तर एकास वाचविण्यात नागरीकांना यश आले आहे. हे दोघे भाऊ घराकडे जाण्यासाठी पुलावरून वाहत असलेल्या पाण्यातून जात असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि ते वाहून गेले. 

Last Updated : Jun 17, 2021, 10:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details