जगन मोहन रेड्डी नरेंद्र मोदींना भेटले, मोदींचे शपथविधी सोहळ्यास येण्याचे निमंत्रण - narendra modi
'मी खरे तर भाजपला लोकसभेत २५० हून अधिक जागा मिळू नयेत, अशी प्रार्थना देवाकडे करत होतो. त्यामुळे मला आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळावा, या अटीवर युती करता आली असती. येत्या ५ वर्षांत मी आणि नरेंद्र मोदींच्या ३०-४० ते ५० वेळा भेटी होऊ शकतात. मी प्रत्येक वेळेस त्यांना आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी करेन,' असे रेड्डी म्हणाले.
नवी दिल्ली - आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडूंविरोधात मोठा विजय मिळवल्यानंतर वायएसआर काँग्रेस प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी दिल्ली येथे नरेंद्र मोदींची भेट घेतली. आलिंगन देऊन दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. जगन मोहन रेड्डी यांनी मोदींना शाल आणि तिरुपती बालाजीची प्रतिमा भेट दिली.
मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी भेट झाल्यानंतर जगन मोहन रेड्डी यांनी 'भाजप २५० जागा जिंकून आला असता, तर परिस्थिती वेगळी असती. तसे झाले असते तर आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या अटीवर आम्ही भाजपला पाठिंबा दिला असता,' असे म्हटले आहे. जगन मोहन रेड्डींच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस लोकसभेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष आहे. वायएसआर काँग्रेसने २२ जागा जिंकल्या आहेत.