नवी दिल्ली -यशवर्धन कुमार सिन्हा यांची मुख्य सूचना आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पदाची शपथ दिली. 26 ऑगस्टला विमल जुल्का हे मुख्य सूचना आयुक्तपदावरून निवृत्त झाले होते. त्यानंतर तब्बल दोन महिने या पदावर कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती. अखेर यशवर्धन कुमार सिन्हा यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रपती भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात राष्ट्रपतींनी सिन्हा यांना पदाची शपथ दिली. सिन्हा पुढील तीन वर्षं या पदावर राहणार आहेत. सिन्हा यांनी यापूर्वी ब्रिटन आणि श्रीलंकेमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून देखील काम केले आहे. नव्या मुख्य सूचना आयुक्तांची नियुक्ती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्यांच्या समितीची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि गृहमंत्री अमित शाहा यांचा समावेश होता. या समितीने यशवर्धन कुमार सिन्हा याचा नावाला पसंती दिल्याने, त्यांची मुख्य सूचना आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. मुख्य सूचना आयुक्त यशवर्धन कुमार सिन्हा यांच्यासोबतच आणखी तीन जणांची सूचना आयुक्तपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामध्ये पत्रकार उदय माहुरकर, हीरा लाल सामारिया आणि सरोज पुन्हानी यांचा समावेश आहे.