हैदराबाद -आज १९ ऑगस्ट(बुधवार) जागतिक मानवता दिवस आहे. याला इंग्लिशमध्ये 'वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन डे' असे म्हणातात. संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना मानवतेच्या भल्यासाठी काम करणाऱ्या योद्ध्यांचा गौरव व्हायला पाहिजे. कोरोनामुळे जगाला अभूतपूर्व अशा अडचणीचा सामना करावा लागत आहे. मात्र, अशा परिस्थितीत कोरोना वॉरिअर्स काम करत आहेत. यासोबतच भूकंप, पूर, सुनामी, युद्ध, महामारी किंवा कोणत्याही आपत्तीच्या काळात मदतीची सर्वात जास्त गरज भासते. तेव्हा पुढे येणाऱ्या मदतीच्या हातांचा गौरव करण्यासाठी जागतिक मानवता दिन साजरा केला जातो. तसेच दुसऱ्यांची सेवा करताना जीव गमवावा लागलेल्या कार्यकत्यांच्या त्यागाचा विसर आपल्याला होऊ नये, म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
संयुक्त राष्ट्र संघटनेने २००८ साली जागतिक मानवता दिनाची स्थापना केली. जगभरात आज गरीब, मागास, युद्धच्या झळा पोहचलेल्या देशांत मानवतावादी कार्यकर्ते मदत करत आहेत. त्यात आता कोरोना महामारीच्या काळात तर मदतीची आणखी गरज भासत आहे. आफ्रिका खंडातील आणि युद्धामध्ये गुरफटलेल्या अनेक देशामध्ये कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य सुविधाही नाहीत. त्यांना मदतीची सर्वात जास्त गरज भासत आहे.
मानवता दिवस का महत्त्वाचा आहे ?
पडद्यामागच्या हिरोंचा सन्मान करण्यात यावा.
मानवतावादी कार्यकर्त्यांची गरज असल्याचे जगासमोर आणणे.
जागतिक स्तरावर उत्सव साजरा करून कार्यकत्यांचे प्रोत्साहन वाढविणे
डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस, सुरक्षा दले हे तर कोरोना विरोधातील लढाई लढण्यासाठी आघाडीवर आहेतच. अनेक स्वयंसेवी संस्थांनीही या कामात स्वत:ला झोकून दिले आहे. रस्त्यावरील भुकेलेल्यांना अन्न पुरवठा असो, किंवा स्थलांतरित कामगारांची खाण्यापिण्याची सोय असो, भारतात अनेक नागरिकांनी मानवतेच्या भूमिकेतून लोकांना मदत केली. या सर्वांना आपण प्रोत्साहन द्यायला हवे. तरच आपण मिळून या महामारीचा सामना करू. आरोग्य क्षेत्रात मदतीची सर्वात जास्त गरज निर्माण झाली आहे. रुग्णालये रात्रंदिवस कोरोना बाधितांची सेवा करत आहेत. काम करताना अनेक डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा जीवही गेला आहे. जीवाची पर्वा न करता ते काम करत आहेत.
नुकतेच आसाम, बिहार उत्तर प्रदेश राज्यात पूर येऊन गेला. काही भागात अजूनही परिस्थिती बिकट आहे. अनेक जण अडचणीत सापडलेल्यांना मदत आहेत. लोकांना पुरातून वाचविताना स्वयंसेवक स्वत:चा जीवही धोक्यात घालत आहेत. जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांना मदत करण्याची भावना श्रेष्ठ असून मानवतेच्या भल्यासाठी झटणाऱ्या कार्यकत्यांचा सन्मान आपण सर्वांनी केलाच पाहिजे. अनेक व्यक्तींनी समाजाच्या सेवेसाठी जीवन वाहून घेतले आहे.
अनेक आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. सिरिया, तुर्की, लेबनॉन, इराक, इराण, अफगाणिस्तान, पॅलेस्टाईन, येमेन या देशांमध्ये बंडखोरांच्या हल्ल्यात अनेक नागरिक ठार झाले आहेत. आला दिवस तेथे रोज हिंसाचाराची घटना घडते. अशा कठीण काळात काम करणारे कार्यकर्त्यांचे जीवनही धोक्यात आहे. अनेक वेळा बॉम्ब हल्ला झाल्याने मदत करणाऱ्या स्वयंसेवकांचाही मृत्यू झाला आहे. या सर्वांना आज आपण सलाम करुयात.