नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे हातावर पोट असलेल्या गरिबांची उपासमार होत आहे. यामुळे सरकारने सर्वसामान्य गोर गरिबांसाठी अन्नधान्याच्या विविध योजना हाती घेतल्या असून रेशनचे वाटप केले जात आहे. या रेशन सुविधेचा लाभ घेण्यासाठी रांगेत थांबलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
रेशन घेण्यासाठी रांगेत थांबल्याने चक्कर येवून महिलेचा मृत्यू - बदायूं कोरोना वायरस न्यूज
प्रल्हादपूर गावातल्या माजरा मोहद्दीन नगरमधील 45 वर्षीय महिला शमीम बानो यांचा रेशन सुविधेचा लाभ घेण्यासाठी रांगेत 3 तास थांबल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
रेशनचा लाभ घेण्यासाठी प्रल्हादपूर गावातल्या माजरा मोहद्दीन नगरमधील 45 वर्षीय महिला शमीम बानो घरापासून 1 किलोमीटर दूर चालत गेल्या. तब्बल 3 तास कडक उन्हात रांगेत उभे राहिल्याने त्या बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळल्या. महिलेच्या कुटूंबीयांना माहिती मिळताच तिला बदायूं शहरात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेत असताना महिलेचा मृत्यू झाला.
शमीम बानो यांचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी गोंधळ केला. घटनेची माहिती मिळताच पर्यवेक्षक संजीव शर्मा, जिल्हा पुरवठा अधिकारी रामेंद्र प्रताप, पुरवठा निरीक्षक संजय चौधरी यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि प्रकरणाची चौकशी केली. दरम्यान तेलंगाणाध्येही राज्य सरकारने केलेली आर्थिक मदत काढण्यासाठी बँकेसमोर रांगेत थांबलेल्या एका महिलेचा जागेवरच कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.