नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्यासाठी कित्येक महिन्यांचा कालावधी लागेल, असे मत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सोमवारी व्यक्त केले. २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये जीडीपी हा घसरुन तब्बल उणे २३.९ टक्क्यांवर गेल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. त्यावर ऑनलाईन पत्रकार परिषद घेत चिदंबरम यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
यावेळी सरकारवर टीका करत चिदंबरम म्हणाले, की अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीसाठी 'अॅक्ट ऑफ गॉड'चे कारण पुढे करणाऱ्या आपल्या अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांना पावलेल्या देवाचे आभार मानायला हवेत. कारण केवळ शेती, जंगल आणि मत्स्योद्योग या क्षेत्रामध्येच ३.४ टक्के एवढी वाढ दिसून आली आहे. इतर सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून आली आहे. मात्र, हे आमच्यासाठी आश्चर्यकारक नक्कीच नाही.