नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील विविध भागात चिनी लष्कराने अतिक्रम केल्याच्या वृत्तास संरक्षण मंत्रालयाने दुजोरा दिल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. चिनी आक्रमणाबाबात पंतप्रधान मोदी का खोटे बोलत आहेत? असा सवाल आज राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
चिनी अतिक्रम संरक्षण मंत्रालयाने मान्य केल्यासंबंधीचा एका वृत्तपत्रातील लेख टॅग करत, मोदी का खोटे बोलत आहेत, असा सवाल गांधी यांनी ट्विटरवरून केला आहे. गलवान व्हॅलीत भारत चीनच्या संघर्षानंतर काँग्रेसकडून हा मुद्दा सातत्याने उठविण्यात येत आहे. गलवान व्हॅलीत भारत आणि चीनच्या सैन्यात धुमश्चक्री झाली. यात 20 भारतीय सैनिक शहिद झाले. त्यानंतर दोन्ही देशांतील सबंध तणावपूर्ण झाले आहेत. त्यानंतर चर्चेच्या अनेक फेऱ्या घेण्यात आल्या. मात्र, अजूनही तोडगा निघाला नाही.
पूर्व लडाखमधील पाँगयांग त्सो, गोग्रा आणि कुंग्रांग नाला भागात चिनी सैन्याने अतिक्रमण केल्याचे भारतीय सरंक्षण मंत्रालायने मान्य केले आहे. 5 मे नंतर चीनकडून पूर्व लडाखमधील विविध भागात अतिक्रमण करण्यात आले आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर असलेल्या बफर झोनमध्ये चीनकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे भारत पूर्वी ज्या ठिकाणी गस्त घालत होता. तेथे जाण्यास चिनी सैन्याकडून अटकाव होत आहे.
संरक्षण मंत्रालयाने नुकतेच आपल्या संकेतस्थळावर गलवान वादासबंधी माहिती अपलोड केली आहे. त्यामध्ये संरक्षण मंत्रालायने चिनी अतिक्रम मान्य केले आहे. चीनबरोबरचा सीमावाद अनेक दिवस चालणार असल्याचेही सरंक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्याची प्रक्रिया क्लिष्ट असून वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेण्याची गरज लष्कराने याआधीही व्यक्त केली आहे.
दोन्ही देशाच्या सैन्यामध्ये चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, तणाव कमी करण्याची प्रक्रिया पूर्व झाली नाही. पूर्व लडाखमधील फिंगर 5 भागात टेहाळणी चौकी उभारण्याचे चीनची मागणी आहे. काही भागातून चिनी सैनिक मागे हटले आहे. मात्र, काही भागात चिनी सैन्य मागे जाण्यास तयार नाही.