नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाने देशातील वाढत्या बेरोजगारीवरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. मागील ४५ वर्षातील बरोजगारीचा दर सर्वात वाईट असल्याचे म्हणत 'काय केलं मोदी?' असा सवाल काँग्रेसने पंतप्रधान मोदींना केला आहे.
'का किये हो मोदी जी?' काँग्रेसचा सवाल
काँग्रेस पक्षाने ट्विटवरून देशातील बेरोजगारीच्या आकडेवारीचा आलेख शेअर केली आहे. २०११-१२ आणि २०२० सालातील बेरोजगारीच्या दराची तुलना यात केली आहे. देशात काँग्रेसची सत्ता असताना फक्त २.२ टक्के होती मात्र, मोदी सत्ताकाळात सप्टेंबर २०२०मध्ये देशातील बेरोजगारी दर ६.६७ टक्क्यांवर गेल्याचे या आलेखावरून स्पष्ट होते. ४ टक्क्यांपेक्षा जास्त बेरोजगारी देशात वाढल्याचे आलेखातून दिसत आहे. मागील ४५ वर्षात देशातील बेरोजगारीची ही सर्वात भयंकर स्थिती असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. सध्या बिहार निवडणुका तोंडावर असून काँग्रेसने बेरोजगारीवरून मोदींना लक्ष्य केले आहे.
नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयानंतर देशातील अर्थव्यवस्था कमजोर झाली होती. तिला सुधारण्याचे प्रयत्न सुरू असताना देशात कोरोनाचा प्रसार झाला. टाळेबंदीमुळे देशातील उद्योग व्यवसाय आणि आर्थिक घडामोडींना खिळ बसली होती. त्यामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या. तर अर्थव्यवस्थेचेही मोठे नुकसान झाले. आता अर्थव्यवस्थेची गाडी हळूहळू रुळावर येत आहे. मात्र, भारताचा विकास दर हा उणे झाला आहे. त्यातच लडाखमधील चीनच्या आक्रमक धोरणामुळे दोन्ही देशांतील संबंध बिघडले आहेत. त्याचा व्यापारावरही परिणाम झाला आहे. अनेक चिनी कंपन्यांवर भारताने बंदी घातली असून व्यापार रोडावला आहे.