जयपूर - येत्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपमध्ये आमदारांच्या घोडेबाजारांसंबधी आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशाच एका आरोपाला प्रत्युत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले, की विरोधी पक्षातील आमदारांना भाजपमध्ये घेण्याचा विचार आम्ही करत नाही. जर आम्हाला तसे करायचे असते, तर केवळ ३५ कोटींमध्ये आम्ही संपूर्ण काँग्रेस पक्षाला विकत घेतले असते, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, की काँग्रेस आमदारांनी राजस्थानचे पावित्र्य नष्ट केले आहे. त्यांचा आपल्या स्वतःच्याच आमदारांवर विश्वास नाही, त्यामुळे ते आमच्यावर घोडेबाजारीचे आरोप करत आहेत. लोक आम्हाला विचारतात, की गहलोत यांचे सरकार पाडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का? आम्हाला त्यासाठी प्रयत्न करण्याची खरेतर गरजच नाही, कारण आपल्याच दुष्कर्मांमुळे काँग्रेसचे सरकार कोसळणार असल्याची टीकाही पुनियांनी काँग्रेसवर केली.