कोलकाता - मंगळवारी सकाळी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना जाधवपूर विद्यापीठात जाण्यापासून रोखण्यात आले. एका कार्यालयीन बैठकीसाठी ते विद्यापीठामध्ये येत होते. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांनी त्यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवत त्यांना विद्यापीठात येण्यास मनाई केली.
#CAA कोलकाता : राज्यपालांना विद्यापीठात येण्यापासून रोखले, विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांनीही दाखवले काळे झेंडे राज्यपाल म्हणून निष्पक्षपातीपणे काम करण्यास धनखड हे असमर्थ ठरले आहेत, तसेच त्यांनी वादग्रस्त अशा नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे त्यांच्याविरोधात हे आंदोलन करत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांच्या हातात 'राजभवन हे नागपूर झाले आहे' (नागपूरला 'आरएसएस'चे मुख्यालय आहे ) अशा आशयाचे फलकही होते.
जवळपास पाऊण तास त्यांना आंदोलक विद्यार्थी आणि शिक्षकांनी गाडीच्या खालीही उतरू दिले नाही. सुरक्षा रक्षकांनी शर्थीचे प्रयत्न करून कसेबसे त्यांना प्रशासकीय इमारतीकडे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एका संघटनेने त्यांचा रस्ता अडवला. त्यानंतर मात्र, राज्यपालांना बैठकीला उपस्थित न राहताच विद्यापीठातून बाहेर जावे लागले.
विद्यापीठाबाहेर जाताना, विद्यार्थ्यांनी त्यांना आपल्या प्रश्नांची उत्तरे मागितली. नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत त्यांचे काय मत आहे, असे विद्यार्थ्यांनी त्यांना विचारले असता, मी सरकारचा नाही तर संविधानाचा प्रतिनिधी आहे, असे ते म्हणाले. सध्या आपण फक्त विद्यार्थी हिताचा विचार करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र या उत्तरांनी विद्यार्थ्यांचे समाधान झाले नाही.
हेही वाचा : नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून विद्यार्थिनीने नाकारले सुवर्णपदक!