इटानगर - अरुणाचल प्रदेशात राज्याबाहेरील ६ समुदायांना स्थायी निवासी असण्याचे प्रमाणपत्र देण्याविरोधात आंदोलन सुरू आहे. आज आंदोलकांनी उपमुख्यमंत्री चौना मेन यांच्या निवासस्थानाला आग लावून उदध्वस्त केले आहे. स्थायी रहिवासी प्रमाणपत्राबाबत राज्य सरकारने नियुक्त केलेल्या एका पॅनलच्या शिफारसींविरोधात स्थानिक आंदोलन करत आहेत.
अनेक दशकांपासून अरुणाचलमध्ये राहणारे मात्र तेथील मूळ निवासी नसणाऱ्या लोकांना हे प्रमाणपत्र जारी केले जात आहे. पोलिसांच्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आंदोलनकर्ते आक्रमक झाले.
शुक्रवारी संध्याकाळी आंदोलकांनी जवळपास ५० गाड्यांना जाळून टाकले होते. तसेच १०० गाड्यांची तोडफोड केली होती. इटनगरमधील ५ सिनेमागृहांना आग लावण्यात आली होती. राज्यातील अशांततेचे वातावरण पाहता सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
राज्यातील परिस्थितीकडे बघता इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्याशी बातचीत करून यासंदर्भात आढावा घेतला आहे. अरुणाचलमधील लोकांना शांतता बाळगावी, असे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले आहे.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यातील परिस्थितीबाबत टि्वट केले आहे. 'अरुणाचल प्रदेशमध्ये पोलिसांच्या गोळीबारात एका निर्दोष व्यक्तीचा मृत्यू झाला हे ऐकून मला दु:ख झाले आहे. यात अनेकजण जखमीही झाले आहेत. युवकाच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. जखमी लोक लवकर बरे व्हावेत आणि अरुणाचल शांतता यावी, अशी मी प्रार्थना करतो', असे राहुल यांनी टि्वट करत म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
गैर अरुणाचल प्रदेश अनुसूचित जनजातीच्या (एपीएसटी) लोकांना स्थायी निवास प्रमाणपत्र (पीआरसी) मिळू नये, अशी आंदोलकांची मागणी आहे. पर्यावरण आणि वनमंत्री नबाम रेबिया यांच्या अध्यक्षतेखालील संयुक्त उच्च शक्ती समितीने तथ्यांची निश्चिती केल्याविनाच आपला अहवाल सादर केला होता, असा आरोपही आंदोलक करत आहेत. यापूर्वी राज्यात अनुसूचित जनजातीमध्ये समाविष्ट अनेक समुदायांचे प्रतिनिधी स्थायी रहिवासी प्रमाणपत्राची (पीआरसी) मागणी करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही अरुणाचल प्रदेशमध्ये राहत आहोत, असे या रहिवासांचे म्हणणे आहे.