नवी दिल्ली - मद्यसम्राट विजय मल्ल्या याने भारत सरकारकडे थकित कर्जाचे पैस माघारी देऊन खटला बंद करण्याची मागणी केली आहे. बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवल्यामुळे आणि मनीलॉड्रींगचा गुन्हा दाखल झाल्याने मल्ल्या इंग्लडला पळून गेला आहे. इंग्लडहून प्रत्यर्पण (दुसऱ्या देशातून माघारी आणण्याची प्रक्रिया) करण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू असून विजय मल्ल्या कायदेशीर लढाई लढत आहे. आता त्याने कोविड-१९ पॅकेजसाठी भारत सरकारचे उपहासात्मक अभिनंदन केले आहे. सरकार हवा तितका पैसा छापू शकते, असे त्याने म्हटले आहे.
'सरकारी बँका पाहिजे तेवढे पैसे छापू शकतात. मात्र, मी १०० टक्के पैसे सरकारी बँकेला देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, माझ्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोणत्याही अटीविना माझे पैसे परत घ्या आणि खटला बंद करा,' असे मल्ल्या याने म्हटले आहे.
बुडित निघालेल्या किंगफिशर एअरलाईन कंपनीचा मालक विजय मल्ल्यावर घोटाळा आणि मनी लाँड्रींगप्रकरणी गुन्हा दाखल आहे. ९ हजार कोटी बुडवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान, आर्थिक पॅकेज जाहीर केल्यामुळे मल्ल्या याने उपहासात्मकरीत्या भारत सरकारचे अभिनंदन केले आहे.
इंग्लडच्या उच्च न्याायालयात विजय मल्ल्या प्रत्यर्पणाचा खटला हरला आहे. त्यानंतर मल्ल्याने या महिन्याच्या सुरुवातीला तेथील सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या आधीही मल्ल्या याने पैसे परत करण्याविषयी वक्तव्य केले होते. मात्र, बँक आणि सक्तवसुली संचलनालय याप्रकरणी दुर्लक्ष करत असल्याचे त्याने म्हटले होते.
दरम्यान, मल्ल्या याने पैसे परत करण्याआधी कर्जाची पुनर्रचना करण्याची मागणी केली आहे. याआधीही मल्ल्याच्या विनंतीवरून बँकांनी त्याच्या कर्जाची पुनर्रचना केली होती. मात्र, मल्ल्याने आता पुन्हा एकदा कर्जाची पुनर्रचना करून केवळ मुद्दल परत करण्याचा आग्रह धरला आहे.