नवी दिल्ली -जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर राज्यामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. मात्र, काश्मीर प्रशासनाने त्यांना परत पाठवले. श्रीनगर विमानतळावर थांबवण्यात आल्यानंतर काश्मीर प्रशासनासोबत चर्चा करतानाचा व्हिडिओ राहुल गांधींनी टि्वटरवर शेअर केला आहे.
श्रीनगर विमानतळावर थांबवण्यात आल्यानंतर राहुल गांधी काश्मीरी अधिकाऱयांशी बातचीत करत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. 'मला राज्यापालांनी काश्मीरमध्ये येण्याचे आंमत्रण दिले होते. आता मी आलो आहे. तर मला थांबवण्यात येत आहे. जर काश्मीरमधील परिस्थिती सामान्य आहे तर आम्हाला थांबवण्यात का येत आहे. आम्हाला फक्त काश्मीरमधील नागरिकांना भेटून तेथील परिस्थिती जाणून घ्यायची आहे. जर राज्यात कलम 144 लागू आहे. तर मी एकटा जातो, असे ते अधिकाऱ्यांशी बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात येत असून विरोधी पक्ष नेत्यांच्या भेटीमुळे राज्यात आणखी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच विरोधी पक्षाच्या शिष्ठमंडळामुळे काश्मीरमध्ये लागू असलेल्या संचारबंदीचेही उल्लंघन होईल, असे जम्मू प्रशासनाने म्हटले.