नवी दिल्ली - नवनियुक्त राज्यसभा सदस्यांचा शपथविधी कार्यक्रम काल(बुधवार) राज्यसभेत पार पडला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली होती. त्याला राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विरोध दर्शवला होता. शपथविधी सुरू असताना घोषणा देण्यास परवानगी नाही, असे ते म्हणाले होते. मात्र, यावरून शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. व्यंकय्या नायडू यांच्यावर सोशल मीडियातूनही शिवप्रेमींकडून टीका होत आहे. यावर आता व्यंकय्या नायडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवाजी महाराजांचा आदरच, मात्र.... घोषणा वादावर व्यंकय्या नायडू यांची प्रतिक्रिया - उद्यनराजे भोसले शपथविधी वाद
उदयनराजे भोसले यांनी खासदार पदाची शपथ घेताना 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली होती. त्याला राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी विरोध दर्शवला होता. शपथविधी सुरु असताना घोषणा देण्यास परवानगी नाही, असे ते म्हणाले होते. मात्र, त्यावरून शिवप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे.
उपराष्ट्रपतींनी ट्विट करून यावर स्पष्टीकरण दिले आहे. 'मी शिवाजी महाराजांचा निस्सीम प्रशंसक आणि भवानी मातेचा भक्त आहे. मात्र, शपथविधी कार्यक्रमात कोणतीही घोषणा द्यायची नसते. या प्रथेची आठवण सदस्यांना करून दिली. यामध्ये शिवाजी महाराजांचा कोणताही अपमान केला नाही, अशी प्रतिक्रिया व्यंकय्या नायडू यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे कोणीही राजकारण करु नये, असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. तर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू नियमानुसार वागले. त्यांच्या इतके संसदेचे नियम माहिती असलेला नेता मी त्या चेअरवर पाहिला नाही. आम्ही सगळे त्यांचे ऐकतो आणि त्यांचा आदर करतो, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. तसेच हा वाद येथेच संपायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.