हैदराबाद- तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असलेला श्वान मेल्याने त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ११ महिन्यांचा 'हुस्की' नावाचा श्वान तापाने फणफणला होता. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारात निष्काळजीपणा केल्याचा आरोप करत डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हुस्की १० सप्टेंबरला आजारी पडला होता. त्यानंतर त्याला पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना हुस्कीचा मृत्यू झाला. त्यानंतर मुख्यमंत्री निवासस्थान 'प्रगती भवन'ने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार डॉक्टर रणजित आणि सहायक लक्ष्मी यांच्यावर उपचारात निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.