नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष म्हणून आज पदभार स्वीकारला. याआधी या पदावर जपानचे डॉ. हिरोकी नाकातानी हे होते. हर्षवर्धन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जगभरात कोरोना विषाणूच्या बळींना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी ते म्हणाले, की कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगासमोर जे संकट उभे ठाकले आहे, त्याला तोंड देण्यासाठी जागतिक स्तरावर देशांनी एकत्र यायला हवे, आणि एकत्रितरित्या याला प्रतिसाद द्यायला हवा. मंगळवारी १९४ देशांच्या सहमतीने त्यांची डब्ल्यूएचओच्या कार्यकारी समिच्या अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली होती. गेल्या वर्षीच जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया संघाने एकमताने भारताची या पदी निवड करण्याचे ठरवले होते. पुढील तीन वर्षांसाठी भारत या कार्यकारी समितीमध्ये असणार आहे, तर एका वर्षासाठी याचे अध्यक्षस्थान भारताकडे असणार आहे.