नवी दिल्ली - अमेरिकेत पोलिसांच्या क्रुरतेविरोधात आंदोलन सुरू असताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा तोडण्यात आला. अशीच एक घटना इंग्लंडमध्ये देखील समोर आली. पित्रोदा यांनी या पाशवी कृत्याचा निषेध केला. त्यांनी या दोन्ही घटनांचा सखोल तपास करण्याची मागणी केली. हे कृत्य करणाऱ्यांना गांधीजींचे मानवतेसाठी असणारे योगदानाचा विसर पडल्याचे ते म्हणाले.
गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना हे समानता, स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांना सुरुंग लागल्याचे प्रतिक आहे. हे कृत्य करणारे महात्मा गांधींनी मानवतेला दिलेल्या योगदानाबाबत अनभिज्ञ असणे दुर्दैवी आहे.
गांधी आजच्या जगात अमेरिका आणि इंग्लंडसारख्या देशांमध्ये जास्त प्रासंगिक ठरतात. मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला आणि जगातील अनेक मोठ्या नेत्यांचे ते प्रेरणास्थान होते, असे पित्रोदा म्हणाले.
२५ मे रोजी अमेरिकेच्या मिनीसोटा राज्यात अफ्रिकन अमेरिकन जॉर्ज फ्लॉइड यांना पोलिसांनी क्रूरतेने मारल्यानंतर संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. यादरम्यान उफाळलेल्या दंग्यांमध्ये अनोळखी व्यक्तींनी वॉशिंग्टन (डिसी)मध्ये गांधींजींच्या पुतळ्याची विटंबना केली. हे प्रकरण समोर आल्यानंतर अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्टर यांनी गुरुवारी दिलगिरी व्यक्त केली.
दरम्यान, लंडनमध्ये पार्लामेंट स्क्वेअर मध्ये असलेल्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती.