'व्हॅलेंटाईन डे' म्हटलं की प्रेमाचा दिवस. जेव्हा कधी प्रेमाचं नाव निघेल तेव्हा 'माऊंटन मॅन' दशरथ मांझीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. या दिवसानिमित्त दशरथ मांझी यांच्या आयुष्यावरील 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष रिपोर्ट.
मांझीच्या प्रेमात संघर्ष, जिद्द आणि पागलपण दिसते. दशरथ मांझी हे नाव नाही तर प्रेमाचे प्रतिक बनले आहे. एखाद्या व्यक्तीवर आपण किती प्रेम करू शकतो, याचं उदाहरण मांझीनं जगासमोर ठेवलं आहे. आपलं प्रेम गमावल्यावर लोक वेगळाच विचार करतात इतकंच काय तर आत्महत्येचाही विचार करतात. मात्र, दशरथ मांझीनं आपल्या प्रेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. खरं प्रेम आणि जिद्द याची नवी व्याख्याच मांझीनं आपल्यासमोर ठेवली आहे.
बिहारच्या गया येथील वजीरगंजच्या गेहलोर घाटी येथील दशरथ मांझीने सतत २२ वर्ष डोंगराची छाती फोडून रस्ता बनवला. ही गोष्ट ऐकायला सोपी वाटते पण फक्त प्रेमापोटी मांझीनं हे करून दाखवलं. त्यामुळेच डोंगर फोडून बनवलेल्या रस्त्याला 'प्रेमपथ' (प्रेमाचा मार्ग) असं नाव देण्यात आलं आहे. आपण सर्वांनीच प्रेमाच्या अनेक कथा ऐकल्या आहेत. मात्र, मांझीचं प्रेम अनोखं आणि प्रचंड ताकदवान वाटतं. मांझीच्या प्रेमात दु:ख नाही, वेदना नाहीत, आहे तो केवळ निरागस भाव. आपल्या प्रिय व्यक्तीसाठीची अपार जिद्द. त्यामुळेच मांझीनं बनवलेला रस्ता आज अनेक पिढ्यांसाठी मोठं प्रतिक बनला आहे.
मांझी यांचे पुत्र भागिरथी मांझी यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. 'दशरथ मांझी यांचा बालविवाह झाला होता. गावातील एका जमीनदार व्यक्तीकडे दशरथ कामाला होते त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. त्यानंतर डोंगराच्या त्याबाजूने कामाला होते. त्यांची पत्नी फगुनिया दररोज त्यांच्यासाठी जेवण घेऊन जात असे. एकेदिवशी जेवण घेऊन जाताना फगुनियाचा तोल गेला आणि ती डोंगरावरून खाली कोसळली. यानंतर काही दिवसांनी तिचं निधन झालं. तेंव्हा मी दहा वर्षांचा होता', असे भागरथी यांनी सांगितले. या घटनेनंतर दशरथ मांझी अनेक दिवस कामावर गेले नाहीत. ते विचार करायचे डोंगराऐवजी जर याठिकाणी रस्ता असता तर माझी पत्नी सहजरित्या माझ्यासाठी जेवण आणू शकली असती. शहर आणि रुग्णालयात जाणंही सहज झालं असतं. बस्स...यानंतरच त्यांनी डोंगर तोडण्याचा निर्णय घेतला, असेही भागिरथी यांनी सांगितले.
मांझी यांनी १९६० ते १९८२ पर्यंत तब्बल २२ वर्ष कठोर मेहनत घेऊन २५ फूट उंच, ३० फूट रुंद आणि ३६० मीटर लांबीचा डोंगर तोडून रस्ता बनवला. लोक त्यावेळी दशरथ यांना पागल म्हणायचे. मात्र, पत्नीच्या प्रेमासाठी त्यांनी हे कठोर काम पूर्ण केले.