नवी दिल्ली -उत्तर प्रदेशात सगळीकडे जंगलराज पसरले असून त्यास कोणतीही सीमा राहिली नाही. सरकारला जाब विचारण्याची हीच योग्य वेळ आहे, असा हल्ला काँग्रेसने योगी आदित्यनाथ सरकारवर केला आहे. हाथरस बलात्काराची घटना ताजी असतानाच राज्यातील बलरामपूर जिल्ह्यातही दलित तरुणीच्या बलात्कारनंतरही वातावरण पेटले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि रणदीप सुरजेवाला यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.
हाथरस बलात्काराच्या घटनेवरून देशात वादळ उठलेले असताना बलरामपूर जिल्ह्यातही एका २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला, त्यावर काँग्रेस नेत्यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. आझमगढ, बागपेठ, बुलंदेश्वर येथे महिलांवर अत्याचार करण्यात आले, असे प्रियांका गांधींनी ट्विट केले आहे. आज (गुरुवार) काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि राहुल गांधी हाथरस येथे पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघाले आहेत. मात्र, पोलिसांनी त्यांना कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत अडविले आहे. यावेळी त्यांना धक्काबुक्कीही झाली.