लखनऊ - उन्नावमधील डॉक्टरांनी एका तरुणाच्या पोटातून ३५ खिळे, ५ लोखंडाच्या चकत्या आणि वाळू बाहेर काढली आहे. प्रत्येक खिळा हा ५ सेंटीमीटर लांबीचा आहे. चंद्रकुसुम रुग्णालयातील डॉ. संतोष वर्मा यांच्या पथकाने या तरुणावर तीन तासांची ही शस्त्रक्रिया केली.
धक्कादायक..! तरुणाच्या पोटातून डॉक्टरांनी बाहेर काढले तब्बल ३५ खिळे - उन्नाव तरुण पोट खिळे न्यूज
अनेकवेळा आपण डॉक्टरांनी चित्रविचित्र शस्त्रक्रिया केल्याचे ऐकतो. उन्नावमधील डॉक्टरांनी एका तरुणाच्या पोटातून खिळे आणि लोखंडी चकत्या बाहेर काढल्याचे समोर आले आहे.
सुखलगंज गावचा रहिवासी असलेला हा रुग्ण चार दिवसांपूर्वी पोटदुखीच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल झाला होता. त्याचा एक्स-रे आणि सी स्कॅन करण्यात आले. दोन्हींचा आलेला अहवाल पाहून आम्हालाही धक्का बसला. या रुग्णाच्या पोटात खिळे आणि लोखंडी चकत्या असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे लवकरात लवकर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती डॉ. वर्मा यांनी दिली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून तो व्यवस्थित बोलत आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात वस्तू त्याच्या पोटात कशा गेल्या, याची माहिती त्याने अद्याप दिली नाही. त्याच्या कुटुंबीयांनीही याबाबत काही सांगितले नाही. लोखंडी वस्तू जर आतड्यात घुसल्या असत्या तर त्याचा जीवही गेला असता, असेही डॉ. वर्मा म्हणाले.