महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारताचा हवाई हल्ला केवळ इशाऱ्यासाठी, ठार करण्यासाठी नाही; भाजप मंत्र्याचे वक्तव्य - India

भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये ठार झालेल्यांच्या आकडेवारीवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच अहलुवालिया यांनी हे वक्तव्य केले आहे.

एस.एस. अहलुवालिया

By

Published : Mar 3, 2019, 6:46 PM IST

नवी दिल्ली -भारताने पाकिस्तानात केलेल्या हवाई हल्ल्यात कुठलीच जीवितहानी झाली नसून तो केवळ पाकिस्तानला दिलेला इशारा होता, असे केंद्रीय राज्यमंत्री एस.एस. अहलुवालिया यांनी म्हटले आहे. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये ठार झालेल्यांच्या आकडेवारीवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच अहलुवालिया यांनी हे वक्तव्य केले आहे.

'एअर स्ट्राईकमध्ये ३०० जण ठार झाले असे पंतप्रधान मोदींनी म्हटले का? भाजपच्या कोणत्या प्रवक्त्याने म्हटले का? किंवा अमित शाहांनी असे आकडे जाहीर केले? एअर स्ट्राईक हा पाकिस्तानला दिलेला इशारा होता की, तुमच्या सुरक्षा बंदोबस्तामध्येही आम्ही पाकमध्ये घुसू शकतो आणि दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करू शकतो', असे अहलुवालिया यांनी सांगितले. अहलुवालिया हे दार्जिलिंग येथून भाजपचे खासदार आहेत.

बंगाली भाषेत संवाद साधताना अहलुवालिया म्हणाले की, जीवितहानी व्हावी अशी आमची इच्छा नव्हती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारताने पाकच्या बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये ठार झालेल्यांबाबत प्रश्न उपस्थित केल्याच्या पार्श्वभूमीवर अहलुवालिया बोलत होते.

काय म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी?

'भारताने पाकमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात किती जण ठार झाले हे विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे. ३०० की ३५०, मी आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये वाचले की, बॉम्ब दुसरीकडेच टाकण्यात आले. नेमका किती जणांचा मृत्यू झाला'?, असे प्रश्न ममतांनी उपस्थित केले.

ABOUT THE AUTHOR

...view details