नवी दिल्ली - संयुक्त अरब अमीरातचे (युएई) परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायेद बिन सुल्तान अल नहयान भारत दौऱ्यावर येणार आहेत. येत्या 7 जुलैला तीन दिवसांच्या दौऱ्यावर अल नहयान भारतात येतील. यावेळी महत्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे.
या दौऱ्यामध्ये दोन्ही देशांची धोरणात्मक भागिदारी व्यापक आणि मजबूत करण्याचा उद्देश असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी सांगितले आहे.
अल नहयान यांच्यासोबत एक शिष्टमंडळदेखील येणार असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले आहे. या भेटीदरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा करतील. भारत आणि संयुक्त अरब अमीरातमध्ये जवळचे संबध आहेत. युएई भारताचा तिसरा व्यापारातील भागिदार आहे. तर चौथा उर्जा पुरवणारा देश आहे.
भारत आणि संयुक्त अरब अमीरात दरम्यान ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि आर्थिक, घनिष्ठ आणि बहुआयामी संबंध आहेत. संयुक्त अरब अमीरातीने मार्च 2019 मध्ये ओआईसी परराष्ट्र मंत्र्याच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'गेस्ट ऑफ ऑनर' म्हणूण आंमत्रीत केले होते.
संयुक्त अरब अमिरात हा मध्यपूर्वेतील एक देश आहे. संयुक्त अरब अमिरात हा सात अमिरात एकत्र येऊन तयार झाला आहे. या सात अमिरात अबुधाबी, दुबई, शारजा, अजमान, उम अल-कुवैन, रस अल-खैमा व फुजैरा या आहेत.