कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाच्या बळींची संख्या सहावर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
राज्याच्या हावडा जिल्ह्यातील गोलाबारी भागात असणाऱ्या एका खासगी रुग्णालयात ५७ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाने कोठे कोठे प्रवास केला होता याचा शोध घेणे सुरू आहे. या व्यक्तीला कोणामार्फत कोरोनाची लागण झाली, याचाही शोध घेणे सुरू आहे.
यासोबतच, उत्तर २४ परगणा जिल्ह्यामधील बेल्घोरियात असणाऱ्या एका रुग्णालयात दुसऱ्या एका ५७ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा व्यक्ती परदेशातून किंवा परराज्यातून आला नव्हता, तर त्याला इथेच कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या व्यक्तीला गेल्या २० वर्षांपासून मधुमेहाचा त्रास होता. तसेच, मूत्रपिंडाच्या आजारासाठी त्याला २३ मार्चपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी रात्री त्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
या दोन्ही रुग्णांच्या कुटुंबीयांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच, राज्यात कोरोनाचे आणखी तीन रुग्ण आढळल्याने एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३४वर पोहोचली आहे.
हेही वाचा :VIDEO : अहमदाबाद पोलिसांचा कहर, भाजीपाल्याच्या गाड्या दिल्या फेकून