नवी दिल्ली - भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या गांधींवरील वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज लोकसभेतही दिसले. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केले. आज हे लोक महात्मा गांधीजींना शिव्या देत आहेत. रामाच्या भक्ताचा असा अपमान करणारी ही रावणाची मुले आहेत, अशी टीका त्यांनी लोकसभेत केली.
यावरून लोकसभेमध्ये चांगलाच गदारोळ झाला. भाजप खासदारांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. तर, या टीकेला प्रत्युत्तर म्हणून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भाजप नेतेच गांधींचे खरे भक्त असल्याचे म्हटले. आम्ही भाजप नेतेच गांधींचे खरे भक्त आहोत तर, सोनिया आणि राहुल गांधींसारखे लोक हे 'गांधीजींचे नकली भक्त' आहेत, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, हेगडे यांनी आपल्या वक्तव्यावरून घूमजाव केले आहे. माझे भाषण हे सगळीकडे उपलब्ध आहे, त्यात आपण पाहू शकता, की मी गांधी किंवा पंडित नेहरूंविरोधात काहीही बोललो नाही. मी केवळ स्वातंत्र्यलढ्याबाबत चर्चा करत होतो, असे स्पष्टीकरण हेगडे यांनी दिले आहे.
महात्मा गांधीजींच्या नेतृत्वात लढला गेलेला स्वातंत्र्य लढा नाटक होते, असे वक्तव्य बंगळुरुत एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी केले होते. हा संपूर्ण स्वातंत्र्य लढा ब्रिटिशांच्या संमतीने आणि पाठिंब्याने लढला गेल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 'या तथाकथित नेत्यांना कधीही पोलिसांनी मारहाण केली नाही. स्वातंत्र्य लढा हे एक मोठे नाटक होते. ही खरी लढाई नसून हा जुळवून आणलेला लढा होता' असे आक्षेपार्ह विधान हेगडे यांनी केले होते. अशा लोकांना महात्मा कसे काय संबोधिले जाते, असा वादग्रस्त सवालही त्यांनी केला होता.
हेही वाचा : तब्बल 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा जत्था भारतात दाखल