नवी दिल्ली : भारत-चीन सीमावादाबाबत केवळ मुत्सद्दीपणेच उपाय शोधणे आवश्यक असल्याचे मत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनावेळी ते बोलत होते.
लडाख आणि शेजारील प्रांतामधील, विशेषतः सीमेवरील आपली भूमिका कित्येक वर्षांपासून स्पष्ट आहे. या भागासंबंधी चीनसोबत आपण कित्येक करार केले आहेत. तसेच, याबाबत आपण कित्येक वेळा चर्चांमधून सामंजस्याने तोडगा काढला आहे. हे करार, सामंजस्याने काढलेले तोडगे - आणि त्यासंबंधीचे इतिहासात घेतले गेलेले निर्णय यांचा दोन्ही बाजूंनी पुन्हा विचार केला जाणे आवश्यक आहे. तेव्हा घेतलेले कित्येक निर्णय हे भविष्याचा विचार करुनच घेतले गेले होते, त्यामुळे या प्रश्नांवर मुत्सद्दीपणे उपाय शोधणे आवश्यक आहे. हा केवळ दोन देशांमधील प्रश्न नसून, याबाबत आपण कसा निर्णय घेतो याकडे जगाचे लक्ष आहे, असेही जयशंकर यावेळी म्हणाले.