हैदराबाद - निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगडला रवाना झाले आहेत, तर मुंबई महापालिकेत कामावर येत नसलेल्या कर्मचाऱ्यांना अंतिम नोटीस देण्यात आली आहे. तसेच केरळमधील काडिनामकुलम येथे मित्रांनीच मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. शिवाय औरंगाबादेत एक मनोरुग्णाने वाघाच्या परिक्षेत्रात रात्र काढल्याची घटना समोर आली आहे.
मुंबई - मुख्यमंत्री बाहेर का पडत नाही? या विरोधकांच्या प्रश्नाला सडेतोड उत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शुक्रवारी रायगडला रोरो बोटीने रवाना झाले आहेत. आज या भागात त्यांचा दौरा असून ते ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात ते अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. यामध्ये वादळामुळे कोकणपट्ट्यातील झालेल्या सर्व नुकसानीबाबत चर्चा केली जाणार आहे.
वाचा सविस्तर- मुख्यमंत्री रायगडला रवाना, नुकसानग्रस्त भागाचा घेणार आढावा
मुंबई - कोरोना विषाणूचे संकट आले असताना मुंबई पालिका रुग्णालयातील कर्मचारी भीतीने कामावर येत नसल्याचे समोर आले आहे. या कामगारांना वारंवार सांगूनही ते कामावर हजर होत नसल्याने थेट कारवाईचा इशारा पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी दिला आहे. शेवटची संधी म्हणून ७२ तासांची अंतिम नोटीस देण्याचे आदेश दिले असून ही नोटीस साथरोग कायद्यानुसार व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, कारवाईनंतर रिक्त पदावर कंत्राटी कामगारांची नियुक्ती करा, असे आदेशही संबंधितांना दिले आहेत.
वाचा सविस्तर-मुंबई पालिका रुग्णालयातील गैरहजर कर्मचाऱ्यांना अंतिम नोटीस, रिक्त पदी कंत्राटी भरती
तिरुवनंतपूरम- देशभरात बलात्काराच्या अनेक घटना घडत आहेत. हा अत्याचार कधी अनोळखी व्यक्तीकडून होतो, तर कधी ओळखीच्या व्यक्तीकडून होतो. ओळखीच्या व्यक्तीकडून झालेला अत्याचार हा अधिक हादरा देणारा ठरत असावा. केरळमधील तिरुवनंतपूरम येथे असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काडिनामकुलम येथे मित्रांनीच आपल्या मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे.
वाचा सविस्तर -धक्कादायक! मित्राच्या पत्नीवर मित्रांकडून सामूहिक बलात्कार
औरंगाबाद - सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाच्या भिंतीवरून उडी मारत एक मनोरुग्ण चक्क वाघाच्या पिंजऱ्याजवळ पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत उघडकीस आला. वाघ पिंजऱ्यात बंदिस्त असल्याने अनर्थ टळला असून उद्यान कर्मचाऱ्यांनी या मनोरुग्णाला पोलिसांच्या स्वाधीन केले.
वाचा सविस्तर -वाघाच्या परिक्षेत्रात मनोरुग्णाने काढली रात्र, सुदैवाने वाचला जीव
नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशामध्ये 9 हजार 851 कोरोनाबाधित आढळले असून 273 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाखांच्यापेक्षा अधिक झाला आहे. तर महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत.