छपरा - बिहारमधील बनियापूर ठाणे क्षेत्रातील पिठौरी नंदलाल टोला गावात जमावाच्या मारहाणीत तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करताना तिघांना अटक केली आहे.
जनावरे चोरीच्या संशयावरुन बिहारमध्ये जमावाने केलेल्या मारहाणीत तिघांचा मृत्यू चोरीच्या आरोपावरुन स्थानिकांनी केली मारहाण
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकअप वाहनातून गावात चोरी करण्यासाठी चोर आले होते. नागरिकांकडील जनावरे चोरण्याचा ते प्रयत्न करत होते. यादरम्यान, एका स्थानिकाने त्यांना हटकताना मारहाण सुरू केली. यानंतर, गावातील नागरिकांना गोळा होत त्यांना जबर मारहाण केली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर, रुग्णालयात उपचार घेताना दोघांचा मृत्यू झाला.
हत्या केल्याचा मृतांच्या कुटुंबीयांचा आरोप
मृतांच्या कुटुंबीयांनी हत्येचा आरोप लावताना म्हटले, की पिकअप वाहन घेऊन ते जनावरे खरेदी करण्यासाठी जात होते. यावेळी रस्त्यामध्येच त्यांना अडवण्यात आले आणि त्यांना मारहाण करण्यात आली. पिठौरी नंदलाल टोला गावच्या सरपंचांनी फोन करुन याची माहिती दिली.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. दोन्ही बाजूंनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुढील तपास सुरू आहे