नवी दिल्ली : भारत बायोटेकने बनवलेल्या कोरोनावरील लसीची चाचणी सध्या सुरू आहे. 'कोव्हॅक्सिन'ची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी जवळपास पूर्ण झाली असून, नोव्हेंबरमध्ये तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात करणार असल्याचे निझाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एनआयएमएस) सांगितले आहे.
या लसीच्या चाचणीतील पहिला टप्पा निम्समध्ये यशस्वीपणे पार पडला. दुसऱ्या टप्प्यामध्ये आतापर्यंत १२ लोकांना बूस्टर डोस देण्यात आला असून, पुढील तीन दिवसांमध्ये ५५ लोकांना ही लस दिली जाणार आहे, अशी माहिती इन्स्टिट्यूटच्या क्लिनिकल ट्रायल विभागाचे नोडल ऑफिसर डॉ. सी. प्रभाकर रेड्डी यांनी दिली.
पहिल्या टप्प्यामध्ये ४५ लोकांना या लसीचा डोस देण्यात आला होता. त्यांच्यावर याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील लोकांना डोस दिल्यानंतर १४ दिवसांनी त्यांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात येतील. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण १०० लोकांनी सहभाग नोंदवला होता. या सर्व स्वयंसेवकांच्या आरोग्याचे गेल्या सहा महिन्यांपासून निरिक्षण करण्यात येत आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये कदाचित २०० लोकांना सहभागी केले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती रेड्डींनी दिली.
भारत बायोटेक आणि आयसीएमआर संयुक्तपणे कोव्हॅक्सिनवर संशोधन करत आहेत. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही)मधून घेतलेल्या सार्स-कोव्ह-२ विषाणूवर अभ्यास करुन या लसीची निर्मिती करण्यात येत आहे.
हेही वाचा :एन-९५ वरील निर्यातबंदी पूर्णपणे हटवली; वाणिज्य मंत्रालयाचा निर्णय